‘लोकसत्ता लोकांकिका’च्या ठाणे विभागीय अंतिम फेरीतील संघ सज्ज

अखेरच्या क्षणी संहितेत केलेला बदल, वेशभूषा-नेपथ्य या गोष्टींवर दिलेला भर, संवादांची उजळणी, अभिनयातील सुधारणेवर लक्ष आणि प्रकाशयोजनेची तयारी.. येत्या शनिवारी होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय अंतिम फेरीतील सर्व महाविद्यालयांतील कलाकारमंडळी आपल्या नाटय़कृतीवर शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणाऱ्या अंतिम फेरीला सामोरे जाण्यापूर्वी आपल्या एकांकिकेत अजिबात कसूर राहू नये, यासाठी केवळ एकांकिकांतील कलाकारच नव्हे तर पाच महाविद्यालयांतील शिक्षक-विद्यार्थीही दक्ष आहेत.

महाराष्ट्रातील महाविद्यालयीन स्तरावर नावाजली जाणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि कोल्हापूर अशा आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी आणि विभागीय अंतिम फेरी असे टप्पे पार केल्यानंतर आठ एकांकिका महाअंतिम फेरीत महाराष्ट्राची लोकांकिका बनण्यासाठी स्पर्धा करतील. ठाणे विभागातील प्राथमिक फेरीतून कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय (उरण), सीएचएम महाविद्यालय (उल्हासनगर), सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय (ठाणे), बी. के. बिर्ला महाविद्यालय (कल्याण), मॉडेल महाविद्यालय (डोंबिवली) ही पाच महाविद्यालये विभागीय अंतिम फेरीत दाखल झाली आहेत. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवारी, ८ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजल्यापासून विभागीय अंतिम फेरीला सुरुवात होणार आहे.

विभागीय अंतिम फेरीतून महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ बनण्यासाठीच्या शर्यतीसाठी पात्र ठरण्यासाठी या पाचही महाविद्यालयांत सध्या जोरदार तयारी सुरू आहे. प्राथमिक फेरीत परीक्षकांनी दिलेल्या सूचनांनुसार संहिता, सादरीकरण, संवादफेक या गोष्टींत आवश्यक ते बदल करतानाच प्रकाशयोजना आणि नेपथ्य यांवर भर देण्यात येत आहे. या महाविद्यालयांत एकांकिकेच्या तालमीचे ‘फड’ रंगत असून त्याला महाविद्यालयातील अन्य विद्यार्थी आणि शिक्षकगणही हजेरी लावत आहेत. ‘लोकसत्ता लोकांकिकामुळे एकांकिका म्हणजे काय, याची प्रत्यक्ष जाणीव विद्यार्थ्यांना झाली. त्यामुळे जे विद्यार्थी एकांकिकेमध्ये सहभागी झाले नाहीत त्या विद्यार्थ्यांमध्येदेखील महाविद्यालयातर्फे सुरू असलेल्या या नाटय़कलाकृतीबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे,’ अशी माहिती कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या ‘जो बाळा जो जो रे जो’ या एकांकिकेचा दिग्दर्शक निखिल पालांडे याने सांगितली. विभागीय अंतिम फेरीसाठी दाखल झाल्याने मॉडेल महाविद्यालयातही उत्साहाचे वातावरण आहे. एकांकिकेच्या तालमीने वेग घेतला असून महाविद्यालयात ज्या ठिकाणी एकांकिकेची तालीम सुरू आहे. ही तालीम पाहण्यासाठी इतर विद्यार्थ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

लोकसत्ता लोकांकिकेच्या रंगमंचावर एकांकिका सादर करण्यासाठी दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या सर्वच आवश्यक गोष्टींची जय्यत तयारी सीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू आहे. विभागीय अंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचे सेंट्री या एकांकिकेचा दिग्दर्शक सिद्धार्थ आखाडे याने सांगितले. ठाणे विभागीय अंतिम फेरीत दाखल झाल्याचा आनंद होत असतानाच काहीसे दडपणही असल्याचे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. या महाविद्यालयातर्फे ‘चौकट’ ही एकांकिका सादर करण्यात येत आहे. ‘प्राथमिक फेरीत नेपथ्यावर लक्ष दिले नव्हते. विभागीय फेरी गडकरी रंगायतनसारख्या एका मोठय़ा व्यासपीठावर होणार असल्यामुळे नेपथ्य चांगले होण्यासाठी अधिक प्रयत्न केले जात आहेत,’ असे बी. के. बिर्ला महाविद्यालयाचा दिग्दर्शक समीर सुमन म्हणाला.

प्रायोजक

‘सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘पितांबरी’ सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या या स्पर्धेचे टेलिकास्ट पार्टनर ‘झी मराठी’ आणि न्यूज पार्टनर ‘एबीपी माझा’ आहेत.