कॅन्सर निदानासाठी शिबिरे; ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा पुढाकार

पुरेशा प्रसाधनगृहांअभावी महिलांच्या कुचंबणेचा विषय सातत्याने चर्चिला जात असताना ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शासकीय कार्यालयांमधील महिला प्रसाधनगृहांची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचा तसेच आवश्यक ठिकाणी नव्याने बांधणी करण्याचा निर्णय जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी जाहीर केला. या कार्यालयांमध्ये दररोज शेकडोंच्या संख्येने महिला कर्मचारी तसेच नागरिकांची येतात. याशिवाय जिल्ह्य़ातील १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिलांसाठी कर्करोग प्राथमिक निदान आणि उपचार केंद्र सुरू करता येईल का याचीही चाचपणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यासंबंधीचे मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली जातील, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पात महिलांच्या विकासासाठी स्वतंत्र्य तरतूद करण्याची सक्ती असतानाही ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांमध्ये महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहांची उभारणी झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव यापूर्वीही पुढे आले आहे. मुंबईशी स्पर्धा करू पहाणाऱ्या ठाणे शहरात ही व्यवस्था फारच तुरळक प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊन किमान शासकीय कार्यालयांमधील महिला कर्मचारी आणि त्याठिकाणी येणाऱ्या महिला

नागरिकांची कुंचबणा तरी थांबविता येईल का यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने पाउल उचलले आहे. ठाणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा उप निवडणूक कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालय, अपर तहसीलदार कार्यालय, ठाणे मध्यवर्ती कार्यालय, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, प्रादेशिक मनोरुग्णालय, वागळे इस्टेट पोलीस ठाणे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ कार्यालय याठिकाणी मोठय़ा संख्येने महिला कर्मचारी कार्यरत आहे. याठिकाणी वेगवेगळ्या कामानिमीत्ताने येणाऱ्या महिला नागरिकांची संख्याही मोठी आहे. असे असताना काही तुरळक अपवाद वगळले तर या कार्यालयांमधील प्रसाधनगृहांची अवस्था दयनिय असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. तसेच या कार्यालयांमधील महिला कर्मचाऱ्यांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्थाही नाही.

महिलांचे  कर्करोग निदान शिबीर

जिल्ह्य़ातील नाविन्यपूर्ण योजनेतून कर्करोग निदान शिबिरांसाठी २ लाख ७० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडियन कॅन्सर एंड सोसायटीतर्फे जिल्ह्य़ातील १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यासंबंधी प्राथमिक तपासणी, उपचार शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना कर्करोग निदानासाठी याचा खूप उपयोग होणार आहे. यामध्ये रक्त चाचणी, एक्सरे तसेच इतर चाचण्यांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्राला  शिबिरासाठी १५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.