कल्याण-डोंबिवलीतील रहिवाशांसाठी अपुरी सुविधा; सात दिवसांत १ हजार ८३ शौचालये बांधण्याचे आव्हान

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील ६ हजार ३३० रहिवासी दररोज उघडय़ावर प्रातर्विधी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ३१ मेअखेपर्यंत पालिकेने १ हजार ८३१ व्यक्तिगत शौचालये बांधणे आवश्यक होते. प्रत्यक्षात ७४८ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर आहेत. मे अखेपर्यंत शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याने नगरविकास विभागाने नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.

स्वच्छ भारत व महाराष्ट्र अभियान हा केंद्र तसेच राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे. हा प्रकल्प नियमित कार्यक्रमानुसार न राबवता विशेष मोहीम म्हणून राबविला जावा असा सरकारचा आग्रह आहे. कल्याण डोंबिवली पालिकेने आतापर्यंत २२ टक्के शौचालयांची बांधणी पूर्ण केली आहेत. ही प्रगती अतिशय असमाधानकारक आहे, असा ठपका नगरविकास विभागाने ठेवला आहे. महापालिकेने येत्या ३१ मेपर्यत १८३१ शौचालये बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे होते. या कामात समाधानकारक प्रगती नसल्याने नगरविकास विभागाने आयुक्त ई.रिवद्रन यांच्याकडे  नाराजी व्यक्त केली आहे.

महापालिका हद्दीत सुमारे तीन ते चार लाख रहिवासी झोपडपट्टय़ांमध्ये राहतात. या झोपडपट्टय़ांना पुरेसे पाणी नसणे, सार्वजनिक व व्यक्तिगत शौचालयांची सुविधा नसल्याने बहुतांशी रहिवासी दररोज उघडय़ावर प्रातर्विधी करतात. झोपडय़ा, वस्ती वाढत असून त्याप्रमाणात शौचालये अपुरी पडत आहेत. त्यामुळे बहुतांशी रहिवाशी शासनाचा उपक्रमापेक्षा स्थानिक गरजेला महत्त्व देतात. पाच वर्षांपूर्वी महापालिका हद्दीत निर्मल स्वच्छतागृह अंतर्गत साडेतीन हजार सार्वजनिक शौचालये शहराच्या विविध भागात बांधण्यात आली आहेत.

परस्पर दावे-प्रतिदावे

झोपडीत प्रातर्विधीसाठी पाणी उपलब्ध नसते. झोपडीच्या जागेत कुटुंबाला राहता येत नाही. तेथे शौचालय कसे बांधणार, असे प्रश्न झोपडीधारक उपस्थित करतात. तर व्यक्तिगत शौचालये बांधणीसाठी रहिवासी १४ हजार रुपये  घेतात.पण शौचालय उभारत नाही,असा दावा अधिकारी करतात.

पालिकेच्या कामांचा लेखाजोखा

  • १८३१ शौचालये उभारायची आहेत. ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करायची होती. प्रत्यक्षात पालिकेने ४२४ शौचालये बांधली.  ३२४ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर आहेत.
  • शौचालयासाठी लाभार्थीला २८ हजार रुपये दिले जातात.  केंद्र,राज्य शासनाने ५ कोटी १० लाखांचा निधी मंजूर असून १ कोटी ४८ लाखाच्या निधीत कामे सुरू आहेत.
  • २०११ च्या जनगणनेनुसार पालिका हद्दीत ४६८० रहिवासी उघडय़ावर प्रातर्विधी करतात. १६५० लाभार्थीसाठी शौचालये बांधण्यात येत आहेत.
  • केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर पालिकेने शौचालये बांधल्याची ३७१ छायाचित्र पाठविली आहेत. एकूण कामाच्या फक्त २२ टक्के काम  पूर्ण केले आहे.