23 November 2017

News Flash

‘टॉयलेट’ भाग दोन; मायानगरीत शौचालयासाठी रिक्षाने जावे लागते दुसऱ्या भागात

मुलुंडमध्ये चाकरमान्यांची होत आहे कुचंबणा

कल्पेश गोरडे, ठाणे | Updated: July 15, 2017 3:03 PM

Mulund : अपुऱ्या शौचालयांच्या संख्येमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

‘स्वच्छ भारत’ मोहिमेंतर्गत केंद्र सरकार सिनेकलावंतांच्या माध्यमातून जनजागृतीसाठी करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र, यातील विरोधाभास असा की, सर्वांत श्रीमंत मुंबई महानगरपालिका हद्दीतील मुलुंड येथील नागरिकांना पुरेशी शौचालये उपलब्ध नसल्याने रोज पदरचे पैसे खर्च करून रिक्षाने दुसऱ्या विभागात शौचालयासाठी जावे लागत आहे. 

सार्वजनिक स्वच्छतेबरोबर शौचालयाचा मुद्दा रोजच्या जीवनातील गरजेची बाब असल्याने या मुलांची लग्न ठरण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी भाड्याने रहावे लागत आहे. या ठिकाणी शौचालयाची संख्या वाढवावी अशी मागणी स्थानिक करत आहेत. अन्यथा १४ ऑगस्ट रोजी मुलुंडमधील बीएमसीटी वॉर्ड समोर उपोषणाला बसण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

मुलुंडमधील पश्चिमेकडे असणाऱ्या केशवपाडा विभागातील गो-शाळा रोडवरील रामगडनगर परिसराची लोकसंख्या २० हजारांच्या घरात आहे. या ठिकाणी लहान-लहान घरे असून या ठिकाणी लोकसंखेच्या तुलनेत ६५० हून अधिक सीटच्या शौचालयाची आवश्यकता आहे. परंतु केवळ ५७ शौचालयचे या ठिकाणी आहेत. ही संख्या कमी असल्यामुळे नागिरकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच आजारी पडत असल्याचे देखील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच यासंदर्भात पालिका सोई-सुविधा देखील उपलब्ध करून देत नसल्याचे स्थानिक सांगतात.

या ठिकाणी असणाऱ्या शौचालयाच्या कमतरतेमुळे लहान मुलांची कुचंबणा होत आहे. तर सकाळी तासनतास ताटकळत उभे रहावे लागते. २०१३ सालापासून पत्र व्यवहार करून देखील पालिकेला जागा मिळत नसल्याचे स्थानिक सांगतात. शौचालयाची संख्या वाढवावी याकरीता पालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली परंतु ते यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे सांगतात.

असलेल्या शौचालयाची वेळोवेळी रंग रंगोटी आणि प्लास्टर लावून नूतनीकरण केले जात असलायचे देखील तेथील स्थानिक सांगत आहेत. तर या ठिकाणी राहत असलेले चाकरमान्यांना ताटकळत उभे राहण्यापेक्षा रिक्षाने मुलुंडमधील पाच रस्ता किंवा अंबिकानगर येथे जावे लागत आहे.

दरवर्षी ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ नावाखाली अर्थसंकल्पात करोडो रुपये खर्च करते तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदान देखील देत असते याच्या जनजागृतीसाठी करोडो रुपये खर्च सुद्धा करते. परंतु मुंबईमध्ये मल:निस्सारण यंत्रणाच कुचकामी ठरत असेल तर हा पैसा नक्की कुठे जातो असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत.

First Published on July 15, 2017 1:28 pm

Web Title: toilets shortage at mulund area people have inconvenience they are going to other ward by rickshaw