ऐरोली, मुलुंड टोलनाक्यांवरून वाहनांना एकच पथकर

मुंब्रा बावळण मार्ग दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ऐरोली आणि मुलुंड या टोलनाक्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना एका ठिकाणचा पथकर माफ करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर पथकर व्यवस्थापनाने शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. टोलनाक्यांवर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा यामुळे कमी होऊन कोंडीत घट होण्याची शक्यता आहे.

मुंब्रा बाह्यवळण रस्ता खुला होईपर्यंत ऐरोली आणि मुलुंडमार्गे प्रवास करणाऱ्या वाहनांना एका ठिकाणी टोल माफ करावा, असे आदेश राज्य सरकारने महिनाभरापूर्वी दिले होते. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी टोलनाका व्यवस्थापनाने केली नव्हती. याबाबत ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी आवाज उठवल्यानंतर सरकारी पातळीवर सूत्रे हलली आणि शुक्रवारपासून हा निर्णय अमलात आला. आधीच्या टोलनाक्यावरील पावती आणि कूपन घेऊन पुढील टोलनाक्यावर जमा करावे, अशा सूचना वाहनचालकांना देण्यात आल्या आहेत. मात्र, कूपन देताना टोलनाक्यांवर वेळकाढूपणा केला जात असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत.

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असून या मार्गावरील अवजड वाहतूक ठाणे, नवी मुंबई, कल्याण तसेच भिवंडी शहरातून वळविण्यात आली आहे. दररोज गर्दीच्या वेळेत ऐरोली-आनंदनगर पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी होत असतानाच त्यात आता अवजड वाहनांची भर पडली आहे.

ऐरोली आणि आनंदनगर या दोन्ही ठिकाणी पथकर भरण्यासाठी वाहनांना थांबावे लागत असून यामुळे दोन्ही पथकर नाक्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागतात. ही कोंडी सोडविण्यासाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली-आनंदनगर पथकर नाक्यावर एकच टोल घेतला जावा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. यामध्ये राज्य सरकारच्या विविध खात्यांतील समन्वयाचा अभाव आणि प्रशासकीय पातळीवरील अनास्था पुरेपूर दिसून येत होती.

दोन्ही ठिकाणी फलक

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असताना पथकर व्यवस्थापनाने आता पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यासाठी दोन्ही टोलनाक्यांवर फलक लावण्यात आले आहेत. त्यात मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत ऐरोली टोल येथे घेतलेली पथकर पावती मुलुंड टोल येथे वैध राहील, अशा स्वरूपाचा मजकूर लिहिलेला आहे.