गुणवत्तेबरोबरच आवकही घटल्याचा परिणाम

ठाणे : मुसळधार पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका टोमॅटोच्या पिकाला बसला असून आवक घटल्याने टोमॅटोचे दर चढणीला लागले आहेत. मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरांतील किरकोळ बाजारात टोमॅटो ५० रुपये किलो दराने विकला जात आहे.

‘उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक घटून दरात वाढ झाली आहे,’ अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. घाऊक बाजारात टोमॅटो १५ ते २० रुपये किलो दराने विकला जात आहे. मात्र, किरकोळ बाजारात विक्रेत्यांनी दर ५० रुपयांपर्यंत वाढवले आहेत. बाजार समित्यांमधील घाऊक बाजारपेठेत येणाऱ्या टोमॅटोची गुणवत्ता घसरली. त्यामुळे कराव्या लागणाऱ्या वर्गीकरणामुळे  ही भाववाढ झाली असल्याची माहिती कल्याण कृषी उत्त्पन्न बाजारसमितीचे अधिकारी देशमुख यांनी दिली.

उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून नवी मुंबई व कल्याण भागाला टोमॅटोचा पुरवठा होतो. त्यामध्ये प्रामुख्याने नारायणगाव, ओतुर, घोटी, पुणे, नाशिक येथील गिरनार बाजार या भागांतून मोठय़ा प्रमाणात टोमॅटोची आयात केली जाते. एरवी नवी मुंबई बाजार समितीमध्ये दर दिवशी टोमॅटोच्या गाडय़ा ८० येतात. मात्र हे प्रमाण सध्या ६० वर येऊन ठेपले आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १०० ते १५० िक्वटल एवढी टोमॅटोची आवक होत होती. मात्र गुरुवारी हे प्रमाण ९० िक्वटल एवढे घटले असून परिणामी टोमॅटोचे भाव वधारले. संततधार पावसामुळे येथील पिकांचे नुकसान झाले असून टोमॅटोच्या पुरवठय़ात काही प्रमाणात घट झाली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे मालाचे नुकसान.

महाराष्ट्रभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तोडणी केलेल्या टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. तोडणी केलेल्या मालापैकी बराच माल कुजल्याने घाऊक बाजारात सरसकट मालाची विक्री केली जाते. घाऊक बाजारात १५ ते १६ रुपये किलो एवढय़ा कमी किमतीमध्ये हा माल विक्रेत्यांना विक्री करण्यात येतो. मात्र किरकोळ विक्रेते त्याच्या गुणवत्तेनुसार वर्गीकरण करत असून उत्तम प्रतिचा टोमॅटो ५० रुपये किमतीने विक्री केला जात असून त्यापैक्षा कमी गुणवत्तेचा टोमॅटो ३०-४० रुपये किलो दराने ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो, अशी माहिती ठाण्यातील किरकोळ विक्रेते रवी कुर्डेकर यांनी दिली. तसेच  बंगळुरहून येणाऱ्या टोमॅटोलाही मुंबईच्या बाजारामध्ये चांगला भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर कोणत्याही भाज्या महागल्या तरी त्यांना पर्याय म्हणून कडधान्ये उपलब्ध असतात. मात्र, जेवणात प्रामुख्याने वापरला जाणारा टोमॅटो महागल्यावर कोणताही पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडते.

 -प्रांजली पवार, गृहिणी.