सागर नरेकर

टाळेबंदीत पुरेसा साठा असूनही मुंबई महानगर क्षेत्रात अन्नधान्यांचे भाव वाढू लागले आहेत. आपत्तीच्या काळात अन्नधान्य, डाळींना असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी यंदा भातशेतीसोबत मोठय़ा प्रमाणावर तुरीची लागवड सुरू केली आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्य़ात झालेली अतिवृष्टी या नव्या प्रयोगासाठी फायदेशीर ठरत असल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.

डाळींना आणि विशेषत: तूरडाळींना असलेली मागणी लक्षात घेता ठाणे जिल्ह्य़ातील कृषीक्षेत्रात यंदा संकटाच्या काळातही वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहेत. यंदाच्या खरीप हंगामात कोकणातले प्रमुख पीक असलेल्या भातासोबत तुरीची लागवडीसाठीही प्रयत्न केले जात असून मोठय़ा संख्येने शेतकरी यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील कृषी अधिकाऱ्यांनी यंदा पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. या बैठकांमध्ये शेकडोंच्या संख्येने शेतकरी डाळींची आणि विशेषत: तूरीच्या लागवडीसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. कल्याण, अंबरनाथ, मुरबाड तालुक्यांतील शेतीबाबत झालेल्या बैठकीत तेथील शेतकऱ्यांनी तूर लागवडीचा एकमुखाने निर्णय घेतला, अशी माहिती कृषी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिला.

तूर लागवडीसाठी जिल्ह्य़ात पोषक वातावरण आहे. बाजारात तूरडाळी मिळत असलेला भाव लक्षात घेता शेतकरी यंदा बियाणांसाठी आग्रह धरताना दिसत आहेत. त्यामुळे यंदा प्रभावीपणे हा प्रयोग राबविण्याची तयारी सुरू आहे.

– सुवर्णा माळी, राज्य कृषी अधिकारी, उल्हासनगर विभाग.

उत्पन्नवाढीसाठी यंदा तुरीसोबत बांबू आणि भोपळ्याच्या लागवडीबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. पडीक जमीन, बांधावर याची लागवड करून अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

– आर. एच. पाटील, अंबरनाथ तालुका कृषी अधिकारी