टोरेंट कंपनीच्या निर्णयावर नाराजी

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : टाळेबंदीच्या काळात उत्पन्नाच्या साधनांवर मर्यादा आल्या असताना गेल्या दोन महिन्यांपासून भिवंडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरात टोरेंट पावर कंपनीकडून सुमारे २० टक्के वाढीव वीज देयके पाठविण्यात आली आहेत. टोरेंट कंपनीच्या या प्रकारामुळे भिवंडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अव्वाच्या सव्वा वीज देयक आकारण्यात येत असल्याने शहरांमधून टोरेंट कंपनीला हटविण्यासाठी नागरिकांकडून होऊ लागली आहे. टोरेंट कंपनीने मात्र, वीजदरांत वाढ केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भिवंडी, कळवा, मुंब्रा, दिवा आणि शीळ डायघर भागात वीज देयक आणि वसूलीचे काम टोरेंट कंपनीकडून करण्यात येत आहे. या कंपनीकडून गेल्या दोन महिन्यांपासून ग्राहकांना २० टक्के वाढीव वीजदेयके पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे दर महिन्याला सुमारे १५० ते २०० युनिटचा वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना थेट ६०० हून अधिक युनिटचे वीज देयक पाठविण्यात येत आहे. अनेकांना १० हजारहून अधिकची वीज देयके आलेली आहेत. टाळेबंदी लागू असल्याने घरातील उत्पन्नाची साधने मर्यादित झाली आहेत. त्यातच ही वाढीव वीज देयके पाठविण्यात येत असल्याने अनेकांनी वीज देयक भरणार नसल्याचे ठरविलेले आहे. व्यावसायिक दुकाने बंद असताना त्यांनाही वीज देयक पाठविण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नागरिकांनी टोरेंट कंपनीला संपर्क साधल्यास त्यांच्याकडून उत्तरे मिळत नसल्याचा आरोप येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे टोरेंट कंपनीला हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. टोरेंट कंपनीकडून नागरिकांची लूट सुरू आहे. या कंपनीविरोधात आम्ही ८ जूनला कंपनीचा निषेध करण्यासाठी कंपनीच्या दारात आंदोलन करणार आहोत, असे आगरी युवक संघटनेचे प्रमुख गोविंद भगत यांनी सांगितले.

टोरेंट कंपनीकडून सरासरी वीज देयक काढण्यात आले. तसेच हे वीज देयक अव्वाच्या सव्वा आहे. ग्रामीण भागातील राहणीमान मुंबई, ठाण्यातील शहरी भागाच्या तुलनेत कमी दर्जाचे असते. त्यामुळे आम्हाला इंधनात सवलत असते. असे असले तरी या टोरेंट कंपनीकडून शहरीभागापेक्षाही जादा वीज दर आकारण्यात येत आहे. 

-भारद्वाज चौधरी, अध्यक्ष, आगरी कोळी भूमिपुत्र महासंघ.

टोरेंट कंपनीकडून कोणतीही वाढीव वीज देयक नागरिकांना आकारण्यात आलेले नाही. एप्रिल महिन्यात सरासरी वीज देयक काढण्यात आले होते. मात्र, मे महिन्यात वीज युनिटचा आकडा मिळाला. त्यानुसार हे देयक पाठविण्यात आलेले आहे. राज्य वीज नियामक आयोगाने आखून दिलेल्या अटींचे आम्ही व्यवस्थित पालन करत आहोत.

-चेतन बदियानी, जनसंपर्क अधिकारी, टोरेंट पावर.