प्रवाशांच्या संख्येत वाढ; एसटी बससाठी एक ते दीड तास रांगेमध्ये

बदलापूर : करोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लागू केलेली टाळेबंदी शिथिल केली जात असली तरी खासगी नोकरदारवर्गाला अद्याप रेल्वे प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना अजूनही राज्य परिवहन मंडळाच्या बसचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यातही प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी त्या तुलनेत बसची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे नोकरदारवर्गाला बसची वाट पाहात एक ते दीड तास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. त्यामुळे खासगी नोकरदारवर्गाचे प्रवासहाल अजूनही सुरूच आहेत.

टाळेबंदी हळूहळू शिथिल केली जात असली लोकल रेल्वे सेवा अजूनही सर्वसामान्य आणि खासगी नोकरदारवर्गासाठी नसल्याने या वर्गाचे मोठे हाल होत आहेत. या प्रवाशांना बदलापूर शहरातून कल्याण, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई उपनगरांत जाण्यासाठी खासगी वाहने आणि राज्य परिवहन मंडळांच्या बसचा आधार घ्यावा लागत आहे. बदलापूरच्या बसस्थानकातून सकाळपासून मुंबई, मंत्रालय, नवी मुंबईला जाण्यासाठी बस सुटत असतात. या बस पकडण्यासाठी प्रवासी सकाळपासूनच बस स्थानकात रांगा लावत असतात. अनेकदा बस स्थानकातील ही रांग रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते. सोमवारी बस स्थानकातील रांग रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचली होती. बसची संख्या तितकीच असली तरी प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बसमध्ये आसन मिळवण्यासाठी प्रवाशांना एक ते दीड तास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. बस स्थानकातच बसची आसने भरली जात असल्याने मार्गावरच्या इतर प्रवाशांना बसमध्ये आसने मिळत नाहीत. त्यामुळे हे प्रवासी उलटा प्रवास करत रिक्षा किंवा खासगी वाहनाने बस स्थानक गाठतात. त्यानंतर स्थानकातून पुन्हा बस पकडून कार्यालय गाठण्यासाठी प्रवास सुरू करतात. त्यामुळे त्यांना घरातून कार्यालयात पोहोचण्यासाठी तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे.

अंबरनाथ, उल्हासनगरकरांचा प्रवास उभ्यानेच

बदलापूर स्थानकातून सुटलेल्या बस प्रवाशांनी गच्च भरून येत असल्याने अंबरनाथ आणि उल्हासनगरातील प्रवाशांना या बसमध्ये अनेकदा प्रवेश मिळत नाही. तसेच प्रवेश मिळाला तर आसन मिळत नाहीत. त्यामुळे या प्रवाशांना इच्छित स्थळापर्यंतचा प्रवास उभ्यानेच करावा लागतो. गेल्या आठवडय़ात अशाच प्रकारे गर्दीमुळे बसमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून एका संतप्त प्रवाशाने बसवर दगड भिरकावला होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप वाढत असल्याचे चित्र आहे.