रविवारचा मुहूर्त साधत जिल्ह्य़ातील विविध पर्यटनस्थळी पर्यटक दाखल

बदलापूर : करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील पर्यटनस्थळे, धबधबे, नद्या या ठिकाणी पर्यटकांना येण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र, या आदेशानंतरही रविवारचा मुहूर्त साधत अनेक पर्यटकांनी जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी गर्दी केली होती. या ठिकाणी खाद्यपदार्थाची दुकाने सुरू झाल्याने पर्यटकांची खाण्याची व्यवस्था झाली असून त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला पर्यटकांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र रविवारी दिसून आले.

करोनाबाधितांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या चिंतेत टाकणारी असून त्यामुळे दुकाने, आस्थापने सुरू झाली असली तरी गर्दी होण्याच्या ठिकाणांवर अजूनही बंदी कायम आहे. ठाणे जिल्हा पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्य़ातील नदी, ओढे, धबधबे या ठिकाणी पर्यटक मोठय़ा संख्येने निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. मात्र सध्याच्या पाचव्या टप्प्यातील टाळेबंदीत अशा ठिकाणी करोनाचा संसर्ग अधिक वाढण्याचा धोका असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी १९ जून रोजी जिल्ह्य़ातील सहाही तालुक्यातील नदी, धबधबे, जंगल, धरण परिसर येथे पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला होता. मात्र त्यानंतरही पर्यटकांनी रविवारचा मुहूर्त साधत जिल्ह्य़ातल्या बहुतांश ठिकाणी गर्दी केली होती. कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर तालुक्यांतील निसर्गरम्य भागात शहरी पर्यटक जाताना दिसत होते. काही चारचाकी तर काही दुचाकीवर समूहाने प्रवास करत असल्याचे चित्र होते.

कल्याण तालुक्यातून वाहणाऱ्या खडवली येथील भातसा नदीवर पर्यटकांची झुंबड पाहायला मिळाली. अनेक तरुण मनसोक्तपणे नदीच्या पाण्यात पोहताना दिसले, तर पर्यटक येत असल्याने नदीकाठची खाद्यपदार्थाची अनेक दुकानेही सुरू असलेली पाहायला मिळाली. कल्याण तालुक्यातील टिटवाळा- गोवेली रस्ता, बदलापूर- रायता रस्त्यावर बारवीच्या प्रवाहात, बारवीच्या जंगलात पर्यटक जमल्याचे दिसून आले. अनेक जण सहकुटुंब सुटीचा आनंद लुटण्यासाठी आल्याचे दिसून आले.

दुकानदारांची निष्काळजी

ग्रामीण भागांतील पर्यटनस्थळांच्या जवळची आणि मार्गावरची अनेक खाद्यपदार्थाची दुकाने ५ जूनपासून सुरू झाली आहेत. पण या दुकानातील खाद्यपदार्थ बनवणारे, विक्री करणारे कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याचे दिसून आले आहे. दुकानात थेट ग्राहकांना प्रवेश दिला जात नसला तरी ग्राहक हाताळताना काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा हौशी पर्यटकांमुळे आणि बेजबाबदार विक्रेत्यांमुळे ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढल्याचे स्थानिक सांगतात.