19 October 2019

News Flash

पर्यटनस्थळांवर शुकशुकाट!

धरणे, धबधब्यांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे हुल्लडबाज पर्यटकांना चाप बसला आहे

पोलिसांच्या बंदोबस्तामुळे हुल्लडबाजीला चाप

ठाणे : मुसळधार पावसाला सुरुवात झाली की, महामुंबई क्षेत्रातील पर्यटकांचे लोंढे ठाणे जिल्ह्य़ाच्या डोंगररांगांत दडलेल्या नैसर्गिक पर्यटनस्थळांकडे वाढू लागतात. मात्र, येथील पर्यटनावर जिल्हा प्रशासनाने घातलेल्या र्निबधांमुळे सलग दुसऱ्या वर्षी या पर्यटनस्थळांवर सुट्टीच्या दिवशीही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. धरणे, धबधब्यांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे हुल्लडबाज पर्यटकांना चाप बसला आहे. मात्र, निव्वळ निसर्ग भटकंती करणाऱ्यांनाही आपल्या हौसेवर पाणी सोडावे लागत आहे. विशेष म्हणजे, पर्यटन र्निबधांमुळे या परिसरांतील स्थानिकांना पावसाळ्यादरम्यान मिळणाऱ्या रोजगारावरही संक्रांत आली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात धबधबे, ओढे, धरणांचा परिसर, वने अशी अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी दर वर्षी पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून अशा पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडू लागल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने पर्यटनावर निर्बंध घातले आहेत. निसर्गाचे वरदान असलेल्या या धबधब्यांवर नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. ही सरसकट बंदी नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी, ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत र्निबधांच्या धसक्यामुळे पर्यटक या ठिकाणी फिरकेनासे झाल्याचे दिसून आले आहे.

पावसाळी पर्यटन केंद्रावर लागू करण्यात आलेल्या र्निबधानंतरच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी सर्वच केंद्रांवर पर्यटक मोठय़ा संख्येने आले होते. मात्र, या ठिकाणी सरसकट बंदीच लागू करण्यात आल्याचे दिसून आले. कोंडेश्वरपासून तीन किलोमीटरपूर्वीच कुळगाव ग्रामीण पोलिसांनी नाकेबंदी केली होती. तेथून पर्यटकांना माघारी पाठवले जात होते. दिवसभरात दहा हजार पर्यटकांना परतवून लावल्याचे पोलिसांनीच सांगितले. त्यामुळे मुंबई, उपनगरांसह कल्याण, शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरहून आलेल्या हजारो पर्यटकांचा हिरमोड झाला. या नाकेबंदीमुळे भोज, दहिवली, धामणवाडी आणि आसपासच्या गावांच्या ग्रामस्थांनाही त्रास सहन करावा लागला.

ओढय़ांवर गर्दी, रिसॉर्ट तुडुंब

कोंडेश्वर येथील कुंडावर जाण्यास बंदी असल्याने भोज धरणातून येणाऱ्या पाण्याच्या ओढय़ांजवळ पर्यटक थांबताना आणि पाण्याचा आनंद घेताना दिसत होते. रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेवर सेल्फी घेताना दिसत होते. तर काहींनी हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये गर्दी करून सुट्टी साजरी केली.

स्थानिकांच्या उत्पन्नावर पाणी

कोंडेश्वर येथे आसपासच्या गाव पाडय़ांवरील अनेक आदिवासी रानभाज्या आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांना येथे बंदी असल्याने त्यांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही बंदी आदिवासींच्या उपजीविकेवर घाला ठरत असल्याची प्रतिक्रिया धामणवाडीचे रघुनाथ कडाळी यांनी दिली आहे. तर माहुली गडाजवळ दररोज दोन ते तीन पोती मक्याच्या कणसाची विक्री होते. मात्र, रविवारच्या बंदीमुळे केवळ एक पोत्याची विक्री झाल्याचे स्थानिक विक्रेत्याने सांगितले.

First Published on July 9, 2019 7:33 am

Web Title: tourist places in thane restrictions on tourist places in thane zws 70