13 August 2020

News Flash

उन्हाळी सुट्टीतला पर्यटन हंगाम बुडाला

गड-किल्ले, पर्यटन स्थळांबाहेरचे छोटे विक्रेते, आदिवासींना फटका

गड-किल्ले, पर्यटन स्थळांबाहेरचे छोटे विक्रेते, आदिवासींना फटका

सागर नरेकर/पूर्वा साडविलकर, लोकसत्ता

ठाणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुले, तरूण आसपासच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे, जलाशये, नदी, गड-किल्लय़ांना भेटी देत असतात. या पर्यटनामुळे त्या त्या ठिकाणी स्थानिकांच्या रोजगाराची एक साखळी निर्माण झाली आहे. करोनाच्या संकटात ही साखळी तुटली आहे. लहान उपहारगृह, लिंबू सरबताची दुकाने, चहाच्या टपऱ्या, माहिती देणारे मार्गदर्शक, वाटाडय़ा अशा सर्वांना करोनाच्या संकटाचा फटका बसला आहे. कोकणातील उन्हाळा शेती तितकीशी प्रभावी नसल्याने अनेक शेतकरीही उन्हाळ्यात या उद्योगांकडे वळत असतात.

ठाणे आणि पालघर जिल्हा निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकीकडे समुद्रकिनारा तर दुसरीकडे घनदाट जंगल असे दुहेरी वैभव या भागात आहे. जिल्ह्यात अनेक गड—किल्ले, निसर्गरम्य ठिकाणे, बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्याने उन्हाळी सुट्टीत यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणावर घराबाहेर पडत असतात. एक किंवा दोन दिवसांची सुट्टी घालवण्यासाठी जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या टाळेबंदीत ही पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. याचा थेट फटका या स्थळांवरील अर्थव्यवस्थेला बसला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा अद्याप तितकासा विकास झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणांवर मोठमोठय़ा हॉटेल, उपहारगृह नाहीत. मात्र त्यांची जागा स्थानिक शेतकरी, आदिवासी बांधवांनी घेतलेली पहायला मिळते. गड—किल्लय़ांच्या पायथ्याशी, जंगलांच्या प्रवेशद्वारावर, नद्यांच्या किनारी अनेक आदिवासी आणि शेतकरी बांधवांनी छोटे उपहारगृहे सुरू केली आहेत. गड किल्लय़ांवर गिर्यारोहणासाठी येणाऱ्या अनेक चमुंसाठी या उपहारगृहातून किंवा थेट घरातून जेवणाची व्यवस्था केली जाते. त्याचसोबत चहाच्या टपऱ्या, लिंबू सरबताची दुकाने, आंबा, कैरी, काकडी, करवंद आणि जांभूळ यांसारख्या रानमेव्याचीही विक्री अशा पर्यटनठिकाणी मोठय़ा प्रमाणावर होते. मात्र करोनामुळे ही व्यवस्था ठप्प झाली आहे. नेरळ येथे कोथळी गडाच्या पायथ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून गिर्हारोहकांना अन्नपदार्थाचा स्वाद देणारे गोपाल झोरी टाळेबंदीमुळे अस्वस्थ झाले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून उपहारगृह बंद असून महत्वाचा हंगाम वाया गेल्याने पुढे करायचे काय, असा प्रश्न ते उपस्थित करतात. तर भिमाशंकर येथील पदरवाडीत राहणारे गणेश दिवाडे हेही पर्यटकांना अनेक वर्षांपासून वाट दाखवतात. त्यातून त्यांना दिवसाता शे पाचशे रूपये मिळतात. मात्र टाळेबंदीमुळे उत्पन्न बंद झाल्याने कुटुंबावर बिकट आर्थिक संकट आल्याचे गणेश सांगतात. पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्र किनाऱ्यावरही आसपासच्या खेडेगावातील आदीवासी नारळ, ताडगोळे, चिंच विक्रीवरही करोनासंकटाची छाया पडली आहे.

स्थानिक रोजगाराविना

बदलापुरजवळील बारवीचे जंगल, नेरळचे माथेरान, उल्हास नदी, खडवलीची नदी येथे स्थानिकांनी अनेक दुकाने सुरू केली होती. ती सध्या बंद आहेत. नेरळ, कर्जत, मुरबाड भागात अनेक शेतघरे आहेत. त्यांना फळे आणि स्थानिक खाद्यपदार्थ देण्याचेही काम स्थानिकांकडून क्ले जात होते. मात्र शेतघरेही बंद असल्याने स्थानिकांचा हक्काचा रोजगार बुडाला आहे. जिल्ह्यात आगरी, कोळी पद्धतीचे जेवण प्रसिद्ध आहे. पर्यटक अनेकदा बाहेर फिरताना त्याचा आग्रह धरतात. त्यामुळे स्थानिकांना चार पैसे मिळत असतात. मात्र सध्या सर्व बंद असल्याने या भागातील नागरिकांचा रोजगार बुडाला असून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2020 2:54 am

Web Title: tourist season of summer vacation is over due to lockdown zws 70
Next Stories
1 Coronavirus : एपीएमसीला करोनाचा विळखा
2 ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही
3 टाळेबंदीमध्ये गुटखा, तंबाखूचे भाव गगनाला
Just Now!
X