News Flash

पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी

अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढतो.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्याने अनेक पर्यटकांनी जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्याचे बेत आखले होते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळांवर बंदी घातल्याने पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील धरणे, तलाव आणि धबधब्यांवर मंगळवार, ८ जूनपासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि ठाणे तालुक्यांत पावसाळी पर्यटनासाठी खाडीकिनारा, धबधबे, तलाव आणि धरणे आहेत. या ठिकाणी जिल्ह्यासह मुंबई, उपनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांतून पर्यटक येत असतात. त्यामुळे अनेकदा अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढतो. जीवितहानी रोखण्याबरोबरच करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सार्वजनिक आणि खासगी जागेत एकत्र येणे, चर्चा करणे, थांबणे, कार्यक्रमांचे आयोजन करणे, इत्यादींमुळे करोना विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढून सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यास धोका होऊ  शकतो. या अनुषंगाने अशा पर्यटनस्थळी जीवितहानीबरोबरच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मनाई आदेश लागू केले आहेत.

आदेशानुसार पावसामुळे वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात पोहणे, धबधब्याच्या प्रवाहाखाली जाणे, धबधब्याच्या परिसरात मद्य बाळगणे, प्राशन करणे, विक्री करणे यांवर बंदी घालण्यात आली आहे. धोकादायक वळणे, कठडे, धबधबे अशा ठिकाणी चित्रीकरण करणे, सेल्फी काढण्यावरही या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. तसेच अशा ठिकाणी जाणे, कोणत्याही प्रकारचे प्रदूषण करणे, या स्थळांपासून एका किलोमीटरपर्यंत अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर खासगी वाहने नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मागील तीन वर्षांपासून अशाच पद्धतीने जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात येत असून या वर्षीही या पर्यटन स्थळांवर जाण्यास मिळणार नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

मनाई असलेली स्थळे

  • ठाणे तालुका- येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, घोडबंदर रेतीबंदर, कळवा-मुंब्रा रेतीबंदर, गायमुख रेतीबंदर, उत्तर सागरी किनारा.
  • कल्याण तालुका- कांबा, पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी.
  •  अंबरनाथ तालुका- कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, दहीवली, मळोचीवाडी, वऱ्हाडे.
  •  मुरबाड  तालुका- सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे, गणपती लेणी, पडाळे धरण, माळशेज घाटातील सर्व धबधबे, पळू, खोपवली, गोरखगड, सिंगापूर, नानेघाट, धसई धरण, आंबेटेंबे, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर.
  •  शहापूर तालुका- भातसा धरण, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, घेरवली, अशोका धबधबा, खरोड, आजा पर्वत डोळखांब, सापगाव नदीकिनारा, कळंबे नदीकिनारा, कसारी येथील धबधबे.
  • भिवंडी तालुका- गणेशपुरी नदी परिसर, नदी नाका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 12:11 am

Web Title: tourists banned from rainy tourist destinations state government break the chain akp 94
Next Stories
1 बदलापुरात आरोग्य कर्मचारी कपात
2 सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांचा सावध पवित्रा
3 आदिवासी, ग्रामीण महिलांची गैरसोय
Just Now!
X