स्वातंत्र्यपूर्व काळात ठाणे शहराची सांस्कृतिक चळवळ जोपासणारे ‘टाऊन हॉल’ नूतनीकरणानंतर पुन्हा गजबजणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या या वास्तूची अवस्था सरकारी गोदामासारखी झाली होती. मात्र जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या आदेशानंतर या वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले. नूतनीकरणानंतर नवी झळाळी घेऊन टाऊन हॉल सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने, सभा, परिसंवादाच्या आयोजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. या वास्तूमध्ये भव्य सभागृह आणि अ‍ॅम्पी थिएटर उभारण्यात आले असून साहित्य, कला, नाटक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या आयोजनासाठी या वास्तूचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
ठाणे शहरातील सांस्कृतिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेले टाऊन हॉल १९२८ साली तत्कालीन दानशूर व्यक्ती कावसनी दिवेचा यांनी बांधून शासनाकडे सुपूर्द केले होते. शहरातील नागरिक आणि संस्थांना अत्यल्प दरामध्ये सभागृह उपलब्ध व्हावा हा त्याचा मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्यपूर्व काळात याच उद्देशासाठी वापरली जाणारी ही वास्तू स्वातंत्र्यानंतर मात्र शासकीय गोडाऊन म्हणून वापरली जाऊ लागली होती. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने १९७४ नंतर या सभागृहात रास्त धान्य विक्री दुकान सुरू करण्यात आले होते. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सं. पां. जोशी यांनी आवाज उठवून रास्त धान्य विक्री दुकानाच्या जंजाळातून मुक्तता केली होती. त्यानंतर निवडणूक साहित्य आणि कर्मचाऱ्यांच्या सामानाने हे सभागृह भरून गेले होते. सरकारी सामान ठेवण्याची अडगळीची खोली अशी त्याची ओळख बनू लागली होती. या वास्तूचे नूतनीकरण व्हावे या उद्देशाने आमदार केळकर यांनी पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या वास्तूच्या पुनर्रचनेची मागणी करण्यात आली होती. यावर कार्यवाही करत जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी या वास्तूच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. लवकरच ही वास्तू पुन्हा नागरिकांसाठी खुली करून देण्यात येणार आहे, अशी माहिती केळकर यांनी दिली.

टाऊन हॉलचा वापर ग्रंथ प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, सभा, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केला जाणार आहे. ही वास्तू अशा कार्यक्रमांना अल्प दरात आणि प्राधान्याने देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. खासगी कार्यक्रमांमुळे येथील सांस्कृतिक कार्यक्रमांची गळचेपी सहन केली जाणार नाही.