विरार स्थानकात उपनगरी गाडी मुख्य रूळ सोडून दुसऱ्या रूळावर गेल्याने पश्चिम रेल्वेचा काही काळासाठी खोळंबा झाला. विरार ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या गाडय़ा काही मिनिटे उशिराने धावत होत्या. या घटनेनंतर स्थानकातील सर्वच फलाटांवरील गाडय़ा काही काळासाठी थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे स्थानकावर मोठी गर्दी उसळली आणि गाडी पकडताना नोकरदार महिलांचे हाल झाले.

शुक्रवारी सकाळी ७.३०च्या सुमारास विरार स्थानकावरील उपनगरी गाडी उभी तिच्या रुळांवरून दुसऱ्या रुळावर वळवण्यात आली. त्यामुळे त्या रूळांवरून धावणाऱ्या गाडय़ा थांबविण्यात आल्या. गाडी तिच्या ‘मेक पॉइंट’वरून दुसरीकडे वळल्याने ही समस्या ओढवल्याचे तंत्रज्ञांनी सांगितले. त्यामुळे सकाळी एक ते दीड तास विरार ते चर्चगेट दरम्यान असलेली उपनगरी सेवा धीम्या गतीने सुरू होती. तसेच ८ ते ८.२० या दरम्यान गाडय़ा थांबवण्यात आल्या होत्या. कामाच्या वेळेत रेल्वे रुळावर समस्या निर्माण झाल्याने प्रवाशांची त्रेधा उडाली.