सम-विषम दुकाने उघडण्याच्या मुद्दयावरून संताप

भाईंदर : करोनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येणाऱ्या सम-विषम पद्धतीला मीरा-भाईंदरमधील व्यापारी वर्गाकडून विरोध करण्यात आला. पोलिसांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे दररोज दुकाने उडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत व्यापारी वर्गाकडून पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशात टाळेबंदी नियम लागू करण्यात आला होता. परंतु अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडल्यानंतर  टप्प्याटप्प्याने  टाळेबंदीत शिथिलता देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरातील बाधित क्षेत्रांना वगळून दुकाने सम-विषम पद्धतीने उघडण्याची मुभा महापालिकेकडून देण्यात आली आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापारी वर्गाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे उत्पन्न ठप्प झाल्यामुळे भाडे तथा उदरनिर्वाह अवघड झाले आहे.

अनेक व्यक्ती पैसे देऊन आपली दुकाने चालू करत आहेत, परंतु आम्हा दुकानदारांवर पोलीस कारवाई करून आमचे नुकसान करत आहेत. त्यामुळे आम्ही आज प्रशासनाची भेट घेतली.

– मुन्ना, दुकानदार