21गे ल्या काही वर्षांत वैद्यकीय आरोग्य क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही नवनवे अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. अनेक असाध्य रोगांवर संशोधन केले जात आहे. या क्षेत्रातील संशोधनासाठी, वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गरज असते ती मृत मानवी देहाची. त्यासाठी अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, गैरसमज यात अडकलेल्या समाजाला अंत्यसंस्काराऐवजी देहदानाचे महत्त्व पटवणे आवश्यक आहे. याच कामाचा पाठपुरावा दधीचि देहदान मंडळ, डोंबिवली या संस्थेचे अध्यक्ष विनायक जोशी गेले अनेक वर्षे सातत्याने करत आहेत.
‘आरोग्यम् धनसंपदा’ हा विचार केंद्रस्थानी ठेवूनच या आगळ्या वेगळ्या, संस्थेचा जन्म झाला. निवृत्तीचा उंबरठा ओलांडल्यावर पुण्याच्या कै. ग. म. सोहनी यांच्या देहदानाच्या विचारांचा प्रभाव डोंबिवलीच्या गुरुदास तांबे यांच्यावर पडला आणि ‘दधीचि देहदान मंडळ’ या सुव्यवस्थित आखीव रेखीव संस्थेच्या रूपाने १९८८ मध्ये तो मूर्तस्वरूपात आला. आपले कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार अशी देहदानासाठी सभासद नोंदणी सुरू झाली. प्रवाहाच्या विरुद्धच प्रवास असल्यामुळे त्यांना समाजाची उपेक्षाही सहन करावी लागली. संस्थेने आता २७व्या वर्षांत पदार्पण केले. आजमितीस संस्थेचे तीन हजार सभासद आहेत आणि साडेपाचशे देहदान झालेले आहे.
या घटकेला कार्यरत असलेल्या गुरुदास तांबे (८२), अच्युत दीक्षित (९२), बाळकृष्ण भागवत यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा, ‘अवघे पाऊणशे वयमान’ असलेल्या ‘तरुण’ विनायक जोशी यांच्या खांद्यावर विसावली आहे. लहानपणापासून समाजकार्याची आवड असल्यामुळे विनायक जोशी यांचा डोंबिवलीच्या सगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग होता. अशाच ओळखीतून गुरुदास तांबे यांच्या ते संपर्कात आले. त्यांच्या देहदानाच्या कार्याची ओळख झाली. आता गेली सहा वर्षे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांमधे आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांअंतर्गत शरीररचनाशास्त्र या विषयाचे आकलन होण्यासाठी शवविच्छेदनास पर्याय नाही. त्यासाठी उपलब्ध मृतदेहांची संख्या फारच अपुरी पडते. पुरवठा व गरज यातील तफावत भरून काढण्यासाठी गरज आहे ती देहदानाची. अनैसर्गिक मृत्यू, सेप्टीसिमिया, एड्स, अति स्थूलव्यक्ती यांचे मृतदेह आणि डॉक्टरांकडून विहित नमुन्यात मृत्यूचे प्रमाणपत्र नसेल तर ‘देह’ स्वीकारता येत नाही. म्हणून नैसर्गिक मृत्यू आलेला ‘देह’ मिळणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी कोणत्याही व्यक्तीची, समूहाची व समाजाची मानसिकता बदलणे हे अवघड काम आहे. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, गैरसमज यांची जळमटे काढण्यासाठी ‘देहदान’ या संकल्पनेचा सातत्याने पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी नाना या वैचारिक संक्रमणाच्या मागे हात धुवून लागलेले आहेत.
विविध संस्थांशी संबंध असल्याने नानांचा कार्यानुभव व जनसंपर्क विलक्षण आहे. त्याचाच फायदा घेत नाना या चळवळीचा परीघ विस्तारत आहेत. वैयक्तिक प्रचार न करता प्रसारमाध्यमांना हाताशी धरत, संस्थांमधून व्याख्याने कार्यशाळा घेण्यात नानांना आठवडय़ाचे दिवस कमी पडतात. देहदान, नेत्रदान, त्वचादान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींकडून इच्छापत्राचे फॉर्म भरून घेणे, जवळच्या नेत्रपेढीला आणि वैद्यकीय महाविद्यालयाला त्यासंबंधी कळविणे, त्यांची नावाची नोंद करणे या कामांबरोबरच दधीचि देहदान मंडळाचा सभासद म्हणून हितगुज व संपर्क साधण्यात नानांचा पुढाकार असतो. चळवळ वाहती ठेवण्यासाठी नाना अनेक क्लृप्त्या योजत असतात. डोंबिवलीत स्थापन झालेल्या मंडळाचे कार्य आज ठाणे जिल्ह्य़ापुरते मर्यादित न राहता रायगड, पालघर, मुंबई येथेही पसरत आहे. मंडळाचे सेवाकार्य रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नाशिक, नागपूपर्यंत पोहोचल्यामुळे मंडळाची सभासदसंख्या वाढत चालली आहे.