कल्पेश भोईर

वसईतील स्थानिक भूमिपुत्र विविध व्यवसाय करून आपली उपजीविका करत होते. वसईच्या विविध समाजांत पारंपरिक व्यवसाय होते. त्यात मीठ उत्पादन, रेती व्यवसाय, वीटभट्टी, सुकेळी, फुलशेती, भातशेती, मत्स्य व्यवसाय आदींचा समावेश होता; परंतु बदलत्या काळाच्या विविध कारणांमुळे या पारंपरिक व्यवसायांवर गदा आली आणि त्यांना उतरती कळा लागली.

वसईचा परिसर हा पारंपरिक व्यवसायात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी विविध पारंपरिक व्यवसाय नावारूपाला आणले आहेत. मात्र सध्याच्या बदलत्या काळानुसार हे  व्यवसायाचे प्रमाण कमी होऊन लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. वसईचा परिसर हा सागरी, नागरी व डोंगरी अशा भागांत विभागला असल्याने या भागातील अनेक पारंपरिक व्यवसाय प्रचलित आहेत. सुरुवातीला वसईत मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारच्या शेतीची लागवड केली जात होती. त्यामध्ये भातशेती, फुलशेती, फळभाज्या व इतर हंगामी पिकांचे उत्पादन घेतले जात होते. याबरोबरच केळीच्या बागाही मोठय़ा प्रमाणात आहेत. वसईची सुकेळी तर जगप्रसिद्ध आहेत. मुंबईसह इतर ठिकाणच्या बाजारात सुकेळीला चांगली मागणी आहे. मात्र, सुकेळी तयार करण्यासाठी लागणाऱ्या राजेळी केळीच्या झाडांच्या प्रमाणातही घट झाली असल्याने सुकेळी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यातच हवामान बदल, अतिवृष्टी यांसारखी निर्माण होणारी संकटे यामुळे मोजकेच शेतकरी सुकेळी तयार करण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे अजूनही वसईची नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

वसई विरार भागातील मीठ उत्पादन हा पारंपरिक व्यवसाय आहे. एके काळी हा व्यवसाय अधिक जोमाने सुरू होता; परंतु सध्या या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे काही भागांत हा व्यवसाय बंद पडू लागला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे, मातीभराव, नव्याने तयार होणाऱ्या इमारती यामुळे मीठ उत्पादित करण्याचे क्षेत्र बाधित होऊन त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातही जे काही मीठ उत्पादक हा व्यवसाय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना मागील काही वर्षांपासून विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे. खाडय़ांचे दूषित झालेले पाणी ही एक मोठी समस्या आहे. विविध प्रदूषणांमुळे खाडय़ांच्या पाण्याचा खारटपणा हा कमी झाला आहे, तर दुसरीकडे कामगार कमतरता, उत्पादन खर्च, बाजारमंदी, पूरस्थिती, अवेळी झालेला पाऊस अशा अनेक कारणांमुळे याचा मोठा परिणाम हा व्यवसायावर होऊ  लागला आहे.

वसईत वनराशी मिठागर, आगरवती सलाम, नवामुख, हिरागर, शेणखई, गुरुप्रसाद, जुना वचक अशी वसई तालुक्यात २५ ते ३० मिठागरे आहेत. या मिठागरातून पिकवलेले मीठ हे मुंबई, गुजरात, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, पंढरपूर अशा ठिकाणी विक्रीसाठी जाते; परंतु बाजारात आलेल्या मंदीमुळे मागील काही वर्षांपासून मिठाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच निर्माण होणारी पूरस्थिती, अवकाळी पाऊस यामुळे जे काही उत्पादन क्षेत्र व उत्पादक शिल्लक आहेत तेही संकटात सापडले आहेत.

मासेमारी व्यवसायातही अशीच काहीशी स्थिती अनुभवास येत आहे. सातत्याने वातावरणातील बदल, वादळी वारे, समुद्रातील प्रदूषण, तेल सर्वेक्षण काळात मासेमारीवर बंदी अशा विविध कारणांमुळे मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने त्याच्या प्रमाणातही घट होऊ  लागली आहे. मात्र अशा स्थितीतही मच्छीमार बांधवांनी हा व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.

काही वर्षांपूर्वी भूमिपुत्रांनी रेती उत्खनन, वीटभट्टी, दगडखाणी या व्यवसायांत उडी घेतली होती. सुरुवातीच्या काळात खनिवडे, नारंगी, कोपरी यासह विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणात रेतीचे पडाव होते आणि त्या वेळी फक्त पाण्यात डुबी मारून रेती बाहेर काढली जात होती, मात्र हळूहळू याची जागा सक्शन यंत्राने घेतली आणि या व्यवसायाचे चित्रच बदलून गेले. त्यामुळे डुब्या पद्धतीने रेती काढणाऱ्या मजुरांचा हातचा रोजगार गेला. यंत्राने झपाटय़ाने रेती बाहेर पडू लागल्याने समुद्राचाही ऱ्हास होऊ  लागला आणि पर्यावरणाच्या प्रश्नामुळे सरकारी यंत्रणांनी र्निबध लावले ते आताही कायम आहेत. यामुळे छुप्या मार्गाने रेती उत्खनन करण्याचे प्रमाण वाढले आहे. जर प्रशासनाने योग्य ती पावले उचलली असती तर नियमानुसार रेती उत्खनन सुरू राहिले असते आणि रोजगारही सुस्थितीत असता. दगडखाणी आणि वीटभट्टीचीही काही वेगळी स्थिती नाही. आज अनेक ठिकाणच्या भागांत इमारती, चाळी, औद्योगिक वसाहती उभारल्या गेल्या असल्याने विटा तयार करण्यासाठी लागणारी मातीच शिल्लक राहिली नाही, तर त्याला तोड म्हणून सुप्रीम ब्लॉक आल्या आहेत. त्यामुळे या इमारत  विकासकांनी मातीच्या विटा घेण्याकडे पाठ फिरवली आहे. तसेच, रेती उपसा आणि वाहतुकीवर असलेल्या कायदेशीर र्निबधामुळे या व्यवसायाशी संबंधित वीट व्यवसायावर कमालीचा फरक पडला आहे. वीटमाल विकत घेणाऱ्यांकडूनच देणी मिळत नसल्याने वीटमजुरांना द्यायला पैसे नसतात. उत्पादित केलेला माल विकला जाण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. त्यातच या अशा निर्माण होणाऱ्या नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत असल्याने यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील मजुरांचा रोजगारही रोडवला आहे. अशातच ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला प्रशासनाकडून चालना नाही, तर दुसरीकडे पारंपरिक व्यवसाय अडचणीत. या स्थितीत या भागात रोजगार मिळणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.