पोशाख हा आपल्या जीवनातील लज्जेचा, संस्कृतीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असतो. पेहराव आणि त्याची पद्धत हे आपला व्यवसाय, जीवनशैली, परिसर तसेच आर्थिक परिस्थिती दर्शवतात. आपले पारंपरिक पोशाख हे त्या काळच्या इतिहासाची आठवण करून देणारे असतात. वसईतल्या ख्रिस्ती समाजातील लोकांचे आगळेवेगळे पेहराव वैशिष्टय़पूर्ण ठरतात. हा केवळ पेहराव नसून त्यांच्या संस्कृतीची प्रतीके मानली जातात.

ख्रिस्ती धर्मातील पहिला संस्कार बाप्तिस्मा स्वीकारल्यानंतर वसईतील लोकांनी आपल्या पोशाखात बदल केला. त्या वेळी पोर्तुगीजांनी पुरुषांना लाल रंगाची टोपी परिधान करण्यास सांगितले. पूर्वी वसईतील काही ख्रिस्ती लोक मुंबईत दूध विकण्यासाठी जात होते, तेव्हा त्या लाल टोपीवरून लोक त्यांना वसईचे दूधवाले म्हणून ओळखत होते, तसेच स्त्रियांना लाल रंगाचे लुगडे आणि लाल रंगाची चोळी परिधान करण्यास सांगितले. या पेहरावावरून इतर लोक त्यांना ख्रिस्ती म्हणून ओळखू लागले. म्हणजेच, त्या वेळी हा पोशाख वसईतील ख्रिस्ती समाजाची ओळख बनला. आपले ऐक्य दाखवण्यासाठीदेखील ख्रिस्ती समाजाने या पेहरावाचा वापर केला.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
vladimir putin
“इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून मॉस्कोत दहशतवादी हल्ला”, पुतिन यांचं वक्तव्य; युक्रेनचा उल्लेख करत म्हणाले…
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

हा पोशाख परिधान करण्याची पद्धत ख्रिस्ती समाजातील लोकांमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसते. सोमवंशी (कुपारी) महिला त्यांचे लुगडे गुडघ्याच्या वर किंवा गुडघ्यापर्यंत नेसत असे. सोमवंशी (वाडवळ) महिला त्यांचे लुगडे गुडघ्याच्या खाली नेसत, तर ईस्ट इंडियन महिला पायघोळ लुगडे नेसत होत्या, तसेच त्या बाहेर जाताना ओढणी डोक्यावरून घेत असे. त्यास ओळ असे म्हणतात म्हणून त्यांना ओळकर असेही म्हणत होते. सर्व ख्रिस्ती महिला त्यांचे पदर समोरून खांद्यावर घेत असत. चोळीच्या बाह्य़ कोपरापर्यंत लांब ठेवत असे. प्रत्येक समाजातील स्त्रिया हातमागावर बनवलेली साडी वापरत, तसेच प्रत्येक समाजपरत्वे त्यांचा लुगडय़ाचे काठ वेगळे असत, तसेच काही स्त्रिया साडीला कंबरेजवळ बटवा शिवून घेत असत. त्यास बटवी असे म्हटले जात होते, तर विधवा स्त्रिया काळ्या रंगाचे लुगडे नेसत होत्या. कोळी आणि मच्छीमार समाजातील ख्रिस्ती स्त्रिया त्यांच्या व्यवसायामुळे त्यांचा मूळ पोशाख म्हणजेच पातळ परिधान करत असे.

वसईतील ख्रिस्ती पुरुषांचा पोशाख सुती पांढरा सदरा किंवा बंडी आणि त्यासोबत मांजरपाटाचे जाड धोतर असा होता. बंडीला दोन खिसे आणि संपूर्ण बाह्य़ाचा असे. मग त्यासह मखमलची लाल टोपी घालत होते. कोळी आणि इतर मच्छीमार समाजातील पुरुषांनी त्यांच्या व्यवसायामुळे त्यांचा मूळ पोशाख सुडका परिधान करत असे.

चर्चचे सण, सोहळे, रविवारच्या सामुदायिक प्रार्थनेला ठेवणीतले कपडे घालत होते. पूर्वी ठेवणीतल्या लुगडय़ाला हायतणी लुगडे म्हणत. चर्चमध्ये जाताना स्त्रिया डोके झाकण्यासाठी पांढरे कापड घेत असे, तसेच पाहुण्यांकडे जाताना खांद्यावर पांढरा रुमाल किंवा टॉवेल घेत असे, तसेच पुरुषही ठेवणीतले कपडे (जरीचे काम केलेले) आणि चर्चमध्ये व इतर ठिकाणी जाताना पांढरे उपरणे खांद्यावर घेत असे.

लग्नप्रसंगी ईस्ट इंडियन समाजातील स्त्रिया पारंपरिक साडीवर, खांद्याच्या दोन्ही बाजूंनी पांढरे कापड बांधून ते मागे सोडले जायचे. सामवेदी (कुपारी), सोमवंशी (वाडवळ) आणि कोळी व इतर मच्छीमार समाजातील स्त्री-पुरुष पारंपरिक पोशाखच परिधान करत होते. मात्र महिला त्या पोशाखांवर मोठय़ा प्रमाणात दागिने घालत असे. अगदी अलीकडेच्या काळात या समाजातील लोकांनी ब्रिटिशांप्रमाणे, स्त्रियांनी पांढरा गाऊन आणि पुरुषांनी काळ्या रंगाचा सूट असा पोशाख परिधान करणे सुरू केले आहे.

ब्रिटिश भारतात आल्यानंतर, ख्रिस्ती लोकांना ईस्ट इंडिया कंपनीत नोकऱ्या मिळू लागल्या. ब्रिटिशांच्या प्रभावामुळे समाजातील लोकांनी हॅट परिधान करण्यास सुरुवात केली. नंतर ते कोटही घालू लागले आणि काही महिलांनीही हॅट घालण्यास सुरुवात केली.

वसईत पोर्तुगीजांचे राज्य आल्यानंतर धर्मातरास सुरुवात झाली आणि येथील स्थानिकांच्या पोशाखांत बदल झाला. पुढे काळानुरूप जीवनशैलीत विविध बदल झाले. त्याचप्रमाणे पेहरावातही आमूलाग्र बदल झाले, पण तरीही येथील समाज आजही त्यांची पारंपरिकता टिकवून आहे. ते विविध सण-सोहळ्याप्रसंगी पारंपरिक पोशाख परिधान करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतात.