सागरी जैवविविधता संवर्धनाची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत

विविध कारणांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ातील समुद्रकिनारे तेलाच्या तवंगामुळे काळवंडले आहेत. याचा परिणाम मासेमारीवर होणार असून पारंपरिक मासेमारी धोक्यात येणार आहे. शेकडो मच्छीमार कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट होण्याची भीती आहे.

झाईपासून ते थेट वसईच्या भुईगावपर्यंतच्या समुद्राला मिळणाऱ्या अनेक लहान-मोठय़ा खाडय़ा आहेत. या खाडीतून येथील स्थानिक व लहान मच्छीमार घोलव्या, पाग, गळ, माग अशा जाळीतून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात. या मासेमारीत ते किनाऱ्यालगतच्या खडकाळ भागात असलेल्या तिवरांच्या भागातील कालवे, चिंबोरी, कोळंबी, उपळ्या, शिंपल्या तर खाडीच्या मुखपात्रात समुद्रकिनाऱ्यावर खरबे, मोडी, निवटी अशा लहान पण खाण्यासाठी प्रसिद्ध असलेले मासे पकडून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात.

तर बोय, तामसुट, शिंगटी आदी मासे पाण्याच्या पृष्ठभागावर आल्यानंतर त्यांची मासेमारी मच्छीमार आपल्या जाळ्याद्वारे करीत असतात. मात्र प्रदूषणामुळे समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या या घातक तेलाच्या तवंगामुळे चविष्ट व हॉटेलला मोठय़ा प्रमाणात मागणी असलेल्या माशांना केमिकलसारखा वास येण्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. प्रदूषणामुळे सरबट, कोकित्र, नारशिंगाळी आदी मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

तेलाचा तवंग साचून व तरंगत असल्यामुळे माशांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने हजारो मासे मृतावस्थेत किनाऱ्यावर अथवा पाण्यावर तरंगतानाच्या घटना घडत आहेत.

कशामुळे तेलतवंग

समुद्रात खोदकाम करणाऱ्या तेलविहिरीतून होणारी तेल गळती, मोठमोठाले बार्ज, बंदरातून ऑइल लावून ठेवलेल्या बोटी समुद्रात जाणे, मासेमारी बोटीतून अंशत: खराब झालेले ऑइल, समुद्री भूगर्भातून निघणारे तेल आदी कारणांमुळे हा तेलाचा तवंग पावसाळी वारे व लाटातून सागरी किनाऱ्यावर येतो. काही तेल तवंग वाळूच्या संपर्कात आल्याने डांबरसदृश गोळ्या तयार होतात.

किनाऱ्यावर वाळूमिश्रित तेलाचे गोळे

डहाणू तालुक्यातील बोर्डी, चिखले, नरपड, धाकटी डहाणू, वरोर, गुंगवाडा, चिंचणी, बोर्डी, तलासरी तालुक्यात झाई आणि पालघर तालुक्यात वडाराई, सातपाटी, केळवे, शिरगाव, उसरणी, दांडा, एडवण, दातिवरे, माहिम, उनभाट, उच्छेळी, नवापूर, मुरबे, नांदगाव, आलेवाडी, तर वसई तालक्यात अर्नाळा, वसई आदी भागांत प्रत्येक वर्षी समुद्रातील तेल गळतीमुळे किनाऱ्यावर वाळूमिश्रित तेलाचे गोळे तयार झाले आहेत.

मासे उत्पत्तीवरही परिणाम

* पावसाळी मासे उत्पत्तीच्या काळातच तेलतवंगाच्या घटना जास्त प्रमाणात घडत असतात. यावेळी सुरुवातीला अंडी घालण्यासाठी मासे किनारी भागात येतात, अशावेळी या तवंगामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाचा परिणाम होत हे अंडीधारी मासे त्या थरात सापडून त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे मासे उत्पत्तीवरही त्याचा परिणाम होत आहे.

* या तवंगामुळे मासेमारीसोबत पर्यटनावरही त्याचा परिणाम होत आहे. केळवे, बोर्डी, अर्नाळासारख्या अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळाकडे पर्यटक पाठ फिरवतात. व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.

खाडीजवळील माशांना चांगली मागणी असल्याने पारंपरिक मासेमारी करणारे मच्छीमार मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे.

– पूर्णिमा मेहेर, कार्यकारी सदस्य, नॅशनल फिश वर्कर्स फोरम व महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

हे प्रदूषण पृथ्वीच्या विरोधातील आहे. तिच्यात न बसणारी कृती (औद्योगिकीकरण) करण्यामुळे असे विपरीत परिणाम होत आहेत.

-अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ