मुंब्रा येथील रेतीबंदर भागातील पाचव्या आणि सहाव्या मार्गिवरील उन्नत मार्गावर तुळई बसविण्याचे काम एका दिवसात पुर्ण केले जाणार होते. मात्र, पाच दिवस उलटूनही हे काम पुर्ण होऊ शकलेले नसून त्याचा फटका रस्ते वाहतूकीला बसू लागला आहे. यामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण या शहरांच्या म्हणजेच महामुंबईच्या वेशीवर रात्री, दुपारी आणि पहाटेच्या वेळेत वाहतूक कोंडी होऊ लागली असून यामुळे या मार्गावर दररोज कामानिमित्त प्रवास करणारा नोकरदार वर्ग हैराण झाला आहे. दरम्यान, गुरूवारी रात्रीपर्यंत तुळई बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याचा दावा एमआरव्हीसीच्या अभियंत्यांनी केला आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) सुरू आहे. या कामाअंतर्गत मुंब्रा येथील रेतीबंदर भागातील उन्नत मार्गिकेवर लोखंडी तुळई बसविण्यात येत आहे. गेल्या शनिवारी म्हणजेच २० मार्च रोजी रात्री १२ वाजता हे काम सुरु झाले. रविवार, २१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे काम पुर्ण केले जाणार होते. या कामाच्या पाश्र्वाभुमीवर रेतीबंदर भागातून जाणारा मुंब्रा बाह््यवळण मार्ग वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय वाहतुक पोलिसांनी घेतला होता. या मार्गावरील अवजड वाहतूक ठाणे, आनंदनगर, ऐरोली, नवी मुंबई आणि ठाणे बेलापूर मार्गे वळविण्यात आली आहे. हि वाहतूक रात्री १० ते पहाटे ५ यावेळेत आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत सुरु असते.

मुंब्रा बाह््यवळण मार्गावरील वाहनांचा भार ठाणे, मुंबई तसेच नवी मुंबई या शहरातील रस्त्यांवर वाढून कोंडी होत आहे. त्याचबरोबर शीळफाटा मार्गे कल्याणच्या दिशेनेही अवजड वाहतुकीचा भार वाढल्याने याठिकाणीही कोंडी होत आहे. पंधरा मिनीटांच्या अंतरासाठी अर्धा ते पाऊण तासाचा अवधी लागत आहे. ठरलेल्या वेळेत हे काम पुर्ण होऊ शकलेले नसून त्याचा फटका या शहरातील वाहतुकीला बसत आहे.