आज मध्यरात्रीपासून दुरुस्तीचे काम सुरू; काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बदल

मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीचे काम अखेर सोमवार (आज) मध्यरात्रीपासून हाती घेण्यात येणार असून या कामाच्या पाश्र्वभूमीवर पुढील दोन महिने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील अवजड वाहतूक ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे ग्रामीण आणि पालघर भागातून दुपार आणि रात्रीच्या वेळेस वळवण्यात येणार आहे. त्यामुळे या भागावर पुढील दोन महिने वाहतूक कोंडीचे सावट आहे.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून नाशिक आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहने मुंब्रा बाह्य़वळण मार्गाचा वापर करतात. हा मार्ग धोकादायक झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पनवेल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती कामाची तयारी केली असून त्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी वाहतूक बदलाची अधिसूचना काढली होती. मात्र या मार्गावरील वाहने ठाणे ग्रामीण आणि पालघर भागातूनही वळवण्यात आली असून त्यासंबंधीची अधिसूचना ठाणे ग्रामीण आणि पालघर पोलिसांनी काढली नव्हती. त्यामुळे मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्ती काम पुढे ढकलण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात पालघर पोलिसांनी वाहतूक बदलांची अधिसूचना काढली होती. मात्र ग्रामीण भागातील मार्गावरील खड्डे बुजविण्याची कामे सुरू असल्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांची अधिसूचना निघाली नव्हती. ही कामे पूर्ण होताच ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्हा प्रशासनाकडे वाहतूक बदलांचा अहवाल पाठविला होता. त्यानुसार ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ग्रामीण भागातील वाहतूक बदलांची अधिसूचना शनिवारी जाहीर केली. त्यामुळे कामातील मोठा अडथळा दूर झाला होता. असे असले तरी दुरुस्तीचे काम केव्हा सुरू करायचे, या निर्णयाचा चेंडू ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या कोर्टात होता. मात्र त्यांनी शनिवार रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती कामांचे वेळापत्रक जाहीर केलेले नव्हते. त्यामुळे दुरुस्ती कामाची तारीख निश्चित झालेली नव्हती. दरम्यान, रविवारी दुपारी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी दुरुस्ती कामाचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार सोमवार रात्री १२ वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक बंद करून त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

वाहतूक बदल

  • जेएनपीटी, नवी मुंबई आणि दक्षिण भारतातून (पुणे-कळंबोलीमार्गे) नाशिक, गुजरात आणि भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना शिळफाटा येथे प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने जेएनपीटी, डी पॉइंट, पळस्पे फाटा, जुना मुंबई-पुणे मार्गावरील चौकफाटा, कर्जत, मुरबाड, सरळगाव, किन्हवली, शहापूरमार्गे मुंबई-नाशिक महामार्गावरून नाशिकच्या दिशेने जाऊ शकतील.
  • जेएनपीटी येथून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत कळंबोली सर्कल, तळोजा, कल्याण फाटा, कल्याण शीळ मार्ग, काटई, पत्रीपूल, दुर्गाडी पूल, कोनगाव, रांजनोलीमार्गे प्रवेश दिला जाणार आहे.
  • जेएनपीटी येथून उरणफाटा, महापे सर्कल, शिळफाटामार्गे गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेश बंद. या मार्गावरील वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत महापे सर्कल, रबाळे नाका, ऐरोली, पटणी सर्कल, ऐरोली सर्कल, मुलुंड, आनंदनगर चेक नाक्यावरून घोडबंदरच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत.
  • मुंबई-अहमदाबाद महामार्गे गुजरात येथून जेएनपीटी आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने टेननाका वसई, वाकोडा टोल प्लाझा, वाडागांव, कवाड टोलनाका, नदीनाका पूल, चाविंद्रा, वडपा, मुंबई-नाशिक महामार्गावरून उजवीकडून येवई नाका, पाइपलाइन मार्ग, सावद चौक, गंधारी पूल, आधारवाडी सर्कल, दुर्गाडी, पत्रीपूल, टाटा पॉवर हाऊस, बदलापूर चौक, खोणी सर्कल, उसाटणेमार्गे तळोजा, न्हावडा फाटा, कळंबोलीमार्गे सोडण्यात येणार आहेत. तसेच चिंचोटी येथून जेएनपीटी येथे भिवंडी नारपोलीमार्गे जाणाऱ्या वाहनांना पहाटे ५ ते रात्री ११ या वेळेत प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना चिंचोटीवरून मालोडी टोलनाकामार्गे अंजूरफाटा येथे पूर्णवेळ प्रवेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वर्सोवा येथून जेएनपीटी आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या अवजड वाहनांना रात्री ११ ते ५ या वेळेत प्रवेश. ही वाहने घोडबंदर रोड, कापूरबावडी, कोपरी, मुलुंड चेकनाका, ऐरोली, पटणी जंक्शन, रबाळे नाका, महापे, उरणफाटामार्गे सोडण्यात येणार आहेत.
  • घोडबंदर मार्गावर दुपारी १२ ते ४ या वेळेतही नियंत्रित पद्घतीने अवजड वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
  • भिवंडी येथून जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बाह्य़वळणमार्गे प्रवेश बंद. या मार्गावरील वाहने मानकोली, मुंबई-नाशिक महामार्ग, रांजनोली नाका, शहापूर, किन्हवली, सरळगाव, मुरबाड, कर्जत, चौकफाटामार्गे सोडण्यात येणार आहेत. तसेच रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत भिवंडी येथून मानकोली, मुंबई-नाशिक महामार्ग, रांजनोली नाका, येवई नाका, पाइपलाइन, सावद चौक, गंधारी पूल, आधारवाडी, दुर्गाडी सर्कल, पत्रीपूल, बदलापूर चौक, खोणी सर्कल, उसाटणे फाटा, तळोजा एमआयडीसीमार्गे, कळंबोली येथून प्रवेश.