ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवामुळे शहरातील रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते रात्री ११ या वेळात हे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी पूल, तीनहात नाका, धर्मवीर नाका, नितीन कंपनी नाका येथून वंदना आगार आणि रेल्वे स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या एसटी, टीएमटी, बेस्ट व खासगी बसेसना या नाक्यावरून ठाण्यांतर्गत भागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच स्थानकातून या चौकातून या वाहनांना जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून कॅडबरी नाका-खोपटनाका-आंबेडकर रस्त्याने-जीपीओ नाक्याकडे वाहतूक करता येईल. तसेच गोल्डन डाइज नाका मार्गे-मीनाताई ठाकरे चौकाकडून जीपीओ नाक्यावरून कोर्टनाका आंबेडकर पुतळा – जांभळी नाका भाजी मार्केटमार्गे स्थानकाकडच्या बाजूकडे जाता येईल. ठाणे स्थानक एसटी थांबा व सॅटिस पुलावरून टॉवर नाक्याकडे जाणाऱ्या एस.टी, टीएमटी या बसेसना सॅटिस ब्रिज येथील प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पार्किंग झोन..

सर्व गोंविद पथकांना कोपरी पूल, तीनहात नाका, धर्मवीर नाका – नितीन कंपनी नाका, कॅडबरी नाका येथून ठाणे शहरांतर्गत व स्थानक बाजूस जाणाऱ्या वाहनांस या नाक्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहने पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर पार्किंग करता येतील.

नो पार्किंग झोन..

पालिका भवन चौक ते अल्मेडा चौक. महापालिका भवन ते ओपन हाऊस-आराधना क्रॉस. ओपन हाऊस ते भक्ती मंदिर. टॉवर नाका – गडकरी रंगायतन – बोटिंग क्लबपर्यंत मासुंदा तलावाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस सर्व प्रकारच्या वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.