भिवंडीकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना अंजूरफाटय़ावर प्रवेश बंद

रमजान ईदच्या दिवशी भिवंडी शहरात मोठय़ा संख्येने नमाज पढणाऱ्या मुस्लीम बांधवांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये तसेच सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी भिवंडीकडे जाणाऱ्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. मुंबई-ठाणे-माणकोलीकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना अंजूरफाटा या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे. या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून कारिवली जकात नाका रोडने विटभट्टीमार्गे इच्छित स्थळी सोडण्यात येणार आहे. ६ जुलै रोजी अथवा चंद्रदर्शनाच्या दिवशी ही अधिसूचना लागू असणार आहे.

भिवंडी शहरात मोठय़ा संख्येने मुस्लीम समाज असून रमजान ईदच्या काळात सकाळच्या वेळेत नमाज पढण्यात येतो. यावेळी रस्त्यावर गर्दी असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी तसेच वाहनचालकांना तत्काळ इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांच्यावतीने भिवंडीकडे जाणाऱ्या वाहतुकीमध्ये बदल केले आहेत.

मुंबई-ठाणेकडून जुन्या ठाणे-आग्रा रोडने अंजूरफाटय़ाकडून भिवंडी शहरात येणाऱ्या टी.एम.टी. आणि एस.टी.च्या सर्व प्रकारच्या बसेस व हलक्या वाहनांना नारपोली पोलीस स्टेशन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पुढे पर्यायी मार्ग नसल्याने टी.एम.टी. व एस.टी.मधील प्रवासी या ठिकाणी उतरतील व तेथूनच प्रवासी घेऊन ही वाहने परतीचा प्रवास करतील. हलकी वाहने ही देवजीनगर अथवा साईनाथ सोसायटी कामतघर रोडने इच्छित स्थळी जातील.

राजनोली चौकातून भिवंडी शहरात जाणाऱ्या एस.टी., के.डी.एम.टी, बसेस, जड-अवजड वाहने, कार, रिक्षा, दुचाकी वाहनांना साईबाबा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांपैकी एस.टी./ के.डी.एम.टी. बसेस साईबाबा जकात नाका येथे प्रवासी उतरवतील व तेथूनच प्रवासी भरून इच्छित स्थळी जातील व इतर वाहने ही साईबाबा जकात नाका येथूनच वळसा घेऊन परत जातील.

वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळफाटा (नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. हलकी वाहने कांबारोड, काटई, खाडीपार या पर्यायी मार्गाने अजयनगर पर्यंत येऊन इच्छित स्थळी जातील व जड वाहने अंबाडी नाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठने अथवा बृहमुंबई महानगरपालिका पाइपलाइन रोडने इच्छित स्थळी जातील. वडपा चेकपोस्ट मार्गे वाडय़ाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धामणगाव जांबोळी पाइपलाइन नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्गे ही वाहने धामणगाव पाइपलाइन येथे उजवीकडे वळण घेऊन पाइपलाइन मार्गे वाडय़ाकडे जातील.

तसेच एस.टी. बसेस या आपले प्रवासी या ठिकाणी उतरतील व तेथूनच प्रवासी घेऊन बस वळवून इच्छित स्थळी जातील, शिवाजी चौकाकडून वंजारपट्टी नाका मार्गे जाणाऱ्या सर्व वाहनांना शिवाजी चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना ही अधिसूचना लागू होणार नाही, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.