वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार; सर्वच रस्त्यांवर कोंडीची शक्यता

ठाणे : ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी रेल्वे पुलावर लोखंडी तुळई बसविण्याचे काम येत्या शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस रात्रीच्या वेळेत करण्यात येणार आहे. या कामामुळे दोन्ही दिवशी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कोपरी पुलावरून होणारी वाहतूक मॉडेला चेक नाका, कळवा, शीळफाटा आणि नवी मुंबई मार्गे वळविण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेत सुरू असणाऱ्या  वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या पुलावर लोखंडी तुळई बसविण्याचे काम हाती घ्यायची आहे. त्यासाठी शनिवार (१६ जानेवारी) आणि रविवार (१७ जानेवारी) रोजी रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी रात्रीच्या वेळेत वाहतूक बदल लागू करण्यात आले असले तरी याचा परिणाम ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील रस्ते वाहतुकीवर जाणवण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ वाढलेली असते. ही अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळवल्याने त्या रस्त्यांवरही  कोंडी होण्याची शक्यता आहे.

मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या वाहनांसाठी असे आहेत वाहतूक बदल

’ हलक्या वाहनांना ऐरोली-जंक्शन, कोपरकर चौक, फोर्टीस रुग्णालय, सोनापूर जंक्शन, एलबीएस रोड, मॉडेला चेक नाका, तीन हात नाका मार्गे ठाण्यात येणे शक्य होईल.

’ हलक्या वाहनांना नवघर रोड, कॅम्पास हॉटेल, ईस्ट वेस्ट रेल्वे पूल येथून वळण घेऊन एसीसी सिमेंट रोड, महाराणा प्रताप चौक येथून उजवीकडे वळण घेऊन मॉडेला चेक नाका, तीन हात नाका येथे येता येईल किंवा मुलुंड टोल नाका येथून डावीकडून नीलमनगर नाका,  ईस्ट वेस्ट रेल्वे पूल येथून वळण घेऊन, महाराणा प्रताप चौक येथून मॉडेला चेक नाका, तीन हात नाका येथे येता येईल.

’ जड वाहनांना ऐरोली, रबाळे, दिवा गाव सर्कल, खेडेकर चौक, टी पॉइंट जक्शन, रबाळे नाका, महापे, शिळफाटा येथून मुंब्रा बाह्य़वळण मार्गे मार्गक्रमण करता येईल.

ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी

’ नाशिकहून पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईत जाणाऱ्या हलक्या वाहनांना साकेत कट, महालक्ष्मी मंदिर, साकेत मार्ग,  कळवा, विटावा, ऐरोली मार्गे जाता येईल. किंवा तीन हात नाका येथून एलबीएस मार्गे, मुलुंड पश्चिम मार्गे आणि तीन हात नाका, गुरुद्वारा सेवा रस्ता, कोपरी चौक, बाराबंगला, माँ बाल निकेतन विद्यालय, आनंदनगर नाका मार्गे जाता येईल.

’ जड वाहनांना खारेगाव टोल नाका, गॅमन चौक, मुंब्रा बाह्य़वळण, महापे नवी मुंबई मार्गे, रबाळे, ऐरोली येथून जाता येईल.

’ गुजरातहून घोडबंदर मार्गे मुंबईत जाणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका, अंजूरफाटा, मानकोली, खारेगाव टोलनाका, मुंब्रा बाह्य़वळण मार्ग, शिळफाटा, ऐरोली मार्गे जाता येईल.