अंबाडी पूल बंद करण्याचा निर्णय चुकीचा असल्याची रेल्वे प्रशासनाची कबुली

रेल्वेच्या हलगर्जीपणाचा मोठा फटका गेल्या दोन महिन्यांपासून वसईकरांना सहन करावा लागत आहे. अंधेरी पूल दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणून रेल्वेने वसईचा अंबाडी पूल वाहतुकीसाठी बंद केला आणि दुरुस्तीसाठी वसई-विरार महापालिकेकडे दीड कोटी रुपये मागितले. मात्र पुलाची दुरुस्तीही झाली नाही आणि पुलावरील वाहतूकही बंद होती. हा पूल बंद झाल्याने वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली आणि शहरात अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. मात्र आता लेखापरीक्षण न करता पूल बंद करण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली रेल्वेने दिली असून पालिकेकडे खर्चाच्या मागणीचे पत्रही मागे घेतले आहे.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी अंधेरी येथे पूल दुर्घटना घडल्यानंतर रेल्वेने धोकादायक सर्व पुलांच्या डागडुजी करण्याचा घेतला होता. त्यानुसार वसईच्या अंबाडी रोडवरील ३८ र्वष जुना असलेला अंबाडी पूल रातोरात वाहतुकीसाठी बंद केला. वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा सर्वात महत्त्वाचा पूल आहे. रेल्वेने पूल बंद केल्याने नव्या पुलावरून वाहतूक वळवण्यात येत होती. परंतु केवळ एकच पूल असल्याने वसईकरांना दररोज मोठय़ा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. या रेल्वे उड्डाणपुलाचे संरक्षण कठडे जीर्ण आणि पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. या पुलावरून अनेक केबल, पाइप नेण्यात आलेले आहेत. डांबरीकरण करत रस्त्यांची डागडुजी करत तब्बल ६ इंच जाडीचा थर या पुलावर जमा झाल्याने त्यावर अतिरिक्त भार पडत चालला होता. अवजड वाहने जात असताना पूल चक्क हलत असल्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करत आहे. पूल बंद केला गेल्यामुळे नवीन पुलावर मोठी वाहतूक कोंडी होऊ  लागली. या दोन्ही उड्डाणपुलांच्या तोंडावर पूर्व व पश्चिम येथे सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे कोंडीत अधिकच भर पडली. या पुलाची दुरुस्ती करून तो वाहतुकीसाठी कधी खुला करणार, अशी मागणी करण्यात येत होती.

या पुलाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा खर्च येणार असून ते पालिकेने भरावा, असे पत्र पश्चिम रेल्वेने महापालिकेला दिले होते. हा रेल्वेचा पूल असल्याने पालिकेने का खर्च करावा, असा प्रश्न महापालिकेने केला होता. खर्चाच्या मुद्दय़ावरून रेल्वे आणि महापालिकेत वाद निर्माण झाल्याने या पुलाची दुरुस्ती रखडली होती. मात्र आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे शिष्टमंडळ रेल्वेमंत्री पियमुष गोयल यांना भेटल्यानंतर रेल्वेने लेखापरीक्षण न करताच पूल धोकादायक असल्याचे जाहीर करून बंद केल्याची कबुली दिली. पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडे दीड कोटी रुपयांच्या मागणीचे पत्रही चुकीने दिले होते आणि ते मागे घेत असल्याचे रेल्वेमंत्र्यांसमोर कबूल केले आणि पत्र मागे घेतले.

पूल लवकरच खुला

जुना पूल बंद केल्याने नव्या पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे जुना पूल किमान हलक्या वाहनांसाठी खुला करावा, अशी मागणी रहिवाशांतर्फे करण्यात आली होती. या मागणीसाठी आम्ही रेल्वेमंत्र्यांना भेटलो, तेव्हा रेल्वेचा हा हजगर्जीपणा उघड झाल्याची माहिती माजी महापौर नारायण मानकर यांनी दिली. त्यामुळे आता हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.