वसई पूर्वेतील वाहतूक कोंडीची समस्या कायम

वसई तालुक्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासाठी उपाययोजना केली जात नसल्याने वसई पूर्वेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. यावर उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते, परंतु अजूनही यावर महापालिकेला उपाययोजना करता आली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वसई पूर्वेत नवघर परिसर आहे. या परिसरात औद्योगिक वसाहती, वाढती लोकवस्ती यामुळे  दररोजच वाहतूक कोंडी होत असल्याने येथील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यातून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी गेल्या वर्षी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या वेळी योग्य ती उपाययोजना करू, असे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही यावर महापालिकेने उपाययोजना केली नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक जटिल होऊन बसली आहे. यावर पालिकेने मार्ग काढून या वाहतूक कोंडीतून सुटका करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरात वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत अजून भर पडली आहे, तसेच रस्ते, रस्त्याच्या कडेला होणारी बेकायदा पार्किंग, बेशिस्त पद्धतीने चालवली जाणारी वाहने यांमुळे शहरात वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात होऊ  लागली आहे. याला नियंत्रणात आणण्याचे काम वाहतूक पोलीस करत असतात. परंतु त्यांनाही वाहतूक कोंडी सोडवण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सकाळ व संध्याकाळच्या वेळेत बस, रिक्षा व इतर वाहनांमुळे मोठय़ा संख्येने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी नागरिक, विद्यार्थी यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतूक कोंडीबाबत महापालिकेने पर्यायी मार्गाचा विचार करावा आणि लवकरच याबाबत तोडगा काढावा यासाठी शिवसेनेकडून गेल्या वर्षी १५ फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलन हाती घेतले होते. या वेळी नागरिकांनी काही मागण्या केल्या होत्या. वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन महापालिकेने दिले होते. मात्र वर्ष उलटूनही या मागण्या पूर्ण न झाल्याने आणि कोणतीही उपाययोजना राबवण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी कायम आहे.

नागरिकांच्या मागण्या काय?

  • वालीव, सातीवलीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग म्हणून वसई विकासिनीजवळून जाणाऱ्या आणि राजवली ते दिवाणमान खाडीवरून जाणाऱ्या रस्त्याने वाहतूक वळवावी.
  • या मार्गावरील राजवली- दिवाणमान खाडीपुलावरील पूल लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी मोकळा करावा.
  • लवकरात लवकर या पुलाचे उर्वरित काम आणि रस्त्याचे डांबरीकरण करून वालीव- सातीवली एकदिशा वाहतूक वळवण्यात यावी.
  • नवघर पूर्व येथे एकच रिक्षा थांबा बनवण्यात यावा. परिवहन सेवेच्या ३० फुटांपेक्षा मोठय़ा बस या मार्गावर आणण्यात येऊ नयेत.