किनारपट्टी भागांतील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा; स्थानिक रहिवासी हैराण

विरार : नववर्ष स्वागतासाठी मंगळवारी रात्री वसई परिसरातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले होते. मात्र बुधवारी घरी परतताना पर्यटकांमुळे किनारपट्टी भागांतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. अनेक रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्याचा फटका स्थानिकांना सहन करावा लागला.

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातील अनेक पर्यटक ३१ डिसेंबरच्या रात्री वसई परिसरातील किनारपट्टीवर आले होते. किनारपट्टी परिसरातील हॉटेल, रिसॉर्टमध्ये विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सकाळी पर्यटकांनी परतीचा प्रवास सुरू केल्याने किनारपट्टी परिसरातील सर्वच रस्ते कोंडीमय झाले. समुद्रकिनारी जाणारे रस्ते अरुंद असल्याने आणि दुतर्फा वाहने चालवल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या.

वसईतील राजोडी, कळंब, अर्नाळा, भुईगाव, सुरुची बाग या किनारपट्टी परिसरातील रस्त्यांवर मोठी कोंडी झाल्याचे वाहनचालकांनी सांगितले. या परिसरातील रस्ते अरुंद आहेत. यामुळे एकावेळी एकच वाहन जाण्याची जागा आहे. समोरून दुसरे वाहन आल्यास रस्त्याच्या खाली उतरावे लागते. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. तसेच हे रस्ते वळणावळणाचे असूनही कोणतेही दिशादर्शक फलक अथवा दिवे या मार्गावर नाहीत. यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतूक कोंडीमुळे येथील स्थानिक नागरिकांनाही अडचणीचा सामना करावा लागला. कोंडीमुळे त्यांना त्यांचे वाहन घेऊन घराबाहेर पडणेही कठीण झाले होते.