17 November 2019

News Flash

सीएनजी पंपांमुळे वाहतूक कोंडी

नौपाडा परिसरातील तीन पेट्रोल पंप येथे सीएनजी भरणा करण्यासाठी येणाऱ्या रिक्षांची संख्या अधिक आहे.

(संग्रहित छायाचित्र)

खोपट, तीन पेट्रोल पंप परिसर आणि वागळे इस्टेट परिसरातील रोजचे चित्र

ऋषीकेश मुळे, ठाणे

शहरातील सीएनजी भरणा केंद्रांवर सकाळ, सायंकाळी रिक्षाचालकांच्या मोठय़ा रांगा लागत असल्याने होणारी वाहतूक कोंडी टाळली जावी यासाठी केंद्र चालकांनी रात्री १० नंतरही पंप सुरू ठेवावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयत्नांना अजूनही मूर्त स्वरूप आलेले नाही. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी मध्यंतरी पंपचालक आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक घेऊन यासंबंधीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. या बैठकीनंतरही पंपचालकांनी रात्री उशिरा ही सुविधा सुरू ठेवण्यास फारशी अनुकूलता दाखवली नसल्याने जुन्या ठाण्यातील खोपट, तीन पेट्रोल पंप आणि वागळे इस्टेट भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

नौपाडा परिसरातील तीन पेट्रोल पंप येथे सीएनजी भरणा करण्यासाठी येणाऱ्या रिक्षांची संख्या अधिक आहे. सकाळी ७ वाजल्यापासून येथील सीएनजी भरणा केंद्रांवर रिक्षांच्या रांगा लागण्यास सुरुवात होते. या भागातील एका सीएनजी भरणा केंद्रावरील  रांगा या अनेकदा दगडी शाळेपर्यंत पोहोचतात, तर दुसऱ्या केंद्रावरील रांगा या गडकरी मार्गावर दूपर्यंत जातात. परिणामी बाजीप्रभू देशपांडे रोड, घंटाळी रोड आणि हरिनिवास या भागांतून प्रवास करणाऱ्या वाहनांना पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. या वाहतूक कोंडीत गेल्या काही दिवसांपासून शालेय वाहने अडकून पडत असून यामुळे ही कोंडी आणखी वाढू लागली आहे. वागळे इस्टेट येथील टीएमटी आगाराच्या बाहेरील परिसरातही सीएनजी भरणा केंद्र असून या ठिकाणीही दूरवर रिक्षांच्या रांगा लागत असल्यामुळे मोठी कोंडी होत आहे. खोपट येथील बाबूभाई पेट्रोल पंप येथेही सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या रिक्षांच्या लांबलचक रांगा लागतात. अगोदरच या ठिकाणी उड्डाणपूल असताना येथील अरुंद रस्त्यावरून मार्ग काढणे वाहनचालकांना जिकिरीचे जाते. त्यामुळे मीनाताई ठाकरे चौकाच्या दिशेने जाणारी वाहतूक अनेकदा कोंडीमुळे ठप्प होते.ही कोंडी दूर करण्यासाठी रिक्षाचालकांकरिता सीएनजी भरण केंद्रे रात्री १० ते सकाळी १०च्या दरम्यान सुरू ठेवावीत, अशी मागणी शहरातील लोकप्रतिनिधींनी पोलीस वाहतूक शाखेकडे केली होती. आमदार संजय केळकर यांनीही पंपचालकांनी रात्री उशिरापर्यंत सीएनजी केंद्र सुरू ठेवावे, अशी सूचना केली होती. मात्र, याबाबत पंपचालकांना सक्ती करता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे ठाण्यातील ही ‘सीएनजी’ कोंडी सुरूच आहे.

 ‘आणखी सीएनजी केंद्रांसाठी प्रयत्न’

कळवा, मुंब्रा या भागांतून सीएनजी भरण्यासाठी ठाणे शहराच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकांची संख्या अधिक असल्याने आणि शहरातील सीएनजी भरणा केंद्रांवरील वाहतूक कोंडी दूर व्हावी याकरिता कळवा, माजिवडा आणि घोडबंदर भागात नव्याने तीन सीएनजी भरणा केंद्र सुरू करण्याविषयीचा पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

नौपाडा भागात सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या रिक्षाचालकांच्या दूरवर रांगा लागत असून या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सीएनजी चालकांनी रात्रीच्या वेळेसही सीएनजी भरणा केंद्र चालू ठेवावे, जेणेकरून या भागातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल.

– मृणाल पेंडसे, नगरसेविका-नौपाडा

सीएनजी भरणा केंद्रे ही खासगी मालकीची आहेत. त्यांनी त्यांची सीएनजी केंद्रे  किती वेळ सुरू ठेवावीत याचे आदेश आम्ही देऊ  शकत नाही. रिक्षाचालकांच्या सीएनजी भरणा केंद्रांवर पूर्वी दोन रांगा लागत होत्या. मात्र वाहतूक विभागाकडून कोंडी दूर करण्यासाठी कारवाई करण्यात आल्यानंतर वाहनांच्या एकेरी रांगा लागू लागल्या आहेत. यामुळे सीएनजी भरणा केंद्र परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली आहे.

– अमित काळे, पोलीस उपायुक्त- ठाणे वाहतूक शाखा

First Published on July 11, 2019 1:24 am

Web Title: traffic congestion due to cng pumps in thane city zws 70