डोंबिवली पूर्व भागातील रामनगरमधील बालभवनभोवती गेल्या महिन्यापासून रेतीचा ढीग, खडीचे मिश्रण करणारा मिक्सर वळणावर उभा करून ठेवण्यात आला आहे. या वीस फुटी रस्त्याच्या निम्मा भाग रेती, खडीचा ढीग, मिक्सरने व्यापला आहे. त्यामुळे या भागात दररोज सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडी होत आहे.
दररोज सायंकाळी बालभवनच्या कोपऱ्यावर काही उडाणटप्पू तरुण चारचाकी, दुचाकी वाहने घेऊन डॉ. राव यांच्या बंगल्याच्या शेजारील कोपऱ्यात गाडय़ा आडव्या लावून उभे असतात. त्यामुळे बालभवन रस्ता सध्या वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडला आहे. वाहतूक पोलिसांनी अनेक वेळा पालिकेला बालभवनजवळील खडीचे ढीग, मिक्सर उचलण्यास सांगितले आहे. पण अधिकारी, ठेकेदार त्यास दाद देत नसल्याचे सांगण्यात येते. बालभवन परिसरात गेल्या दोन महिन्यापासून गटार बनविण्याची कामे सुरू होती. तोपर्यंत वाहन चालकांनी खडी, रेती व तेथील अडथळ्यांचा त्रास सहन केला. आता या भागातील एका बाजूची गटारे बांधून पूर्ण झाली आहेत. मात्र, या कामासाठी आणण्यात आलेली खडी, रेती, मिक्सर भर रस्त्यात पडून आहे. या साहित्यामुळे रस्त्याला अडथळा होत आहे, याचे थोडेही भान ठेकेदार, पालिका अधिकाऱ्यांना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सकाळ, संध्याकाळ अनेक लहान मुले बालभवनमध्ये प्रशिक्षणासाठी येतात. या मुलांना दुचाकी, चारचाकीवरून घेऊन त्यांचे पालक येत असतात. रस्त्यावरील अडथळ्यांमुळे पालकांना आपली वाहने कोठे उभी करून ठेवायची, असा प्रश्न पडत आहे. मानपाडा रस्त्यावरून येणारी सर्व वाहने बालभवनजवळ वळसा घेऊन रेल्वे स्थानकाच्या दिशेने जातात. या सर्वाना या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास होऊ लागला आहे.

स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
ठाणे : कम्बाइण्ड ग्रॅजुएट लेव्हल परीक्षेविषयी फॉर्म भरणे, स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी इ. विषयी रविवार, दि. ६ मार्च रोजी विनामूल्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निवृत्त अधिकारी, सुहास सीताराम पाटील या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. या परीक्षेतून इन्स्पेक्टर (इन्कम टॅक्स, कस्टम्स, सेंट्रल एक्साइज) आणि सब इन्स्पेक्टर (सी. बी. आय.) यांची भरती होते. विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा मोठय़ा संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणेतर्फे करण्यात आले आहे.