कोपरी पुलावरील वाहतूक कोंडीवर महिन्याभरात तोडगा

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम महिनाअखेरीस सुरू होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिली.  ठाणे मेट्रोची निविदा प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे आणि त्यासोबतच भिवंडीतील माणकोली आणि रांजनोली भागातील उड्डाण पुलावरील उर्वरित मार्गिका एक जूनपासून वाहतुकीसाठी खुल्या केल्या जाणार आहेत, असेही अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पूल चार पदरी असल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीने या पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोपरी येथे नवा आठ पदरी पूल बांधण्यात येणार असून या कामाची निविदा प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होऊन महिनाअखेरीस प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिली.

१ जूनपासून उड्डाणपुलाची एक बाजू खुली

मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी येथील माणकोली आणि रांजनोली भागातील उड्डाणपुलाची कामे रखडल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. हा मुद्दा बुधवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित झाला होता. या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांचाही आढावा बैठकीत घेतला. त्यावेळेस माणकोली येथील उड्डाणपुलाची दुसरी बाजू आणि रांजनोली येथील उड्डाणपुलाची एक बाजू वाहतुकीसाठी एक जूनपासून खुली होणार असल्याची माहिती दराडे यांनी बैठकीत दिली.