मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे सुरू असलेले काम आणि वाहतूक पोलिसांचे ढिसाळ नियोजन यामुळे दररोज सकाळ-सायंकाळी वाहतूक कोंडीत सापडणाऱ्या प्रवाशांना शुक्रवारी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाणे शहरातील दौऱ्यामुळे काही काळ कोंडीमुक्त प्रवासाचा आनंद अनुभवता आला. पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड टोलनाका आणि पुढे कोपरी पुलावर एरवी वाहनांच्या रांगा दिसून येतात. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असूनही डोळेझाक करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर टोलनाक्यावरील वाहतुकीचे काटेकोरपणे नियोजन केले. या वेळी टोलनाक्यावरील पिवळ्या पट्टीबाहेर वाहनांची रांग लागताच वाहने सोडून देण्यात येत होती. दुपारी दोननंतर मुख्यमंत्री ठाण्यातील बैठक आटोपून माघारी फिरले आणि दिवसभर सुरू असलेले वाहतुकीचे नियोजन नंतर मात्र कोलमडून पडले.

मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील अवजड वाहतुकीचा भार नवी मुंबई आणि ठाण्यातील रस्त्यांवर आला आहे. पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तासाभराचा कालावधी लागत आहे. गर्दीच्या वेळेत अवजड वाहने या रस्त्यांवर येणार नाहीत अशी घोषणा यापूर्वी ठाणे वाहतूक पोलिसांनी केली होती. तसेच ऐरोली आणि मुलुंडपैकी एकाच टोलनाक्यावर टोल आकारणी केली जावी, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, या दोन्ही निर्णयांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने मुलुंड टोलनाक्यावरील प्रवास प्रवाशांना नकोसा वाटू लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या शुक्रवारच्या दौऱ्यामुळे मात्र या प्रवाशांना काही वेळेपुरती का होईना दिलासा मिळाला. ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला होता. त्यामुळे सकाळपासूनच मुंबई, ठाणे वाहतूक पोलिसांची यंत्रणा महामार्गावर तैनात ठेवण्यात आली होती. गर्दीच्या वेळेत या मार्गात एकही अवजड वाहन फिरकू नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात होती. टोलनाक्यावर वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता टोलनाका व्यवस्थापन आणि वाहतूक पोलीस मेहनत घेताना दिसत होते. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती त्या ठिकाणी त्वरित वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक कोंडी सोडवण्यात येत होती. साधारण दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री मुंबईच्या दिशेने परतले. तेव्हा मात्र कोपरी पूल आणि टोलनाक्यावरील गोंधळ पुन्हा एकदा सुरू झाला.