मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीला फटका; कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहनांच्या रांगा

ठाणे आणि मुंबईदरम्यानच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पूल ते कॅडबरी जंक्शनपर्यंतच्या पट्टय़ातील वाहतूक कोंडी सोमवारीही कायम होती. कोपरी पुलावरील रस्त्यावरील दोनदा बुजवलेला खड्डा रविवारी रात्री पुन्हा उघडा पडल्यामुळे येथील वाहतुकीचे नियंत्रण करावे लागले. परिणामी या ठिकाणहून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना पाच मिनिटांच्या अंतरासाठी १५ ते २० मिनिटे तिष्ठत राहावे लागले.

मुंबई-नाशिक महामार्गावरील कोपरी पुलावर दोन्ही बाजूला दोनपदरी रस्ता आहे. वाहनांच्या वर्दळीच्या तुलनेत हा पूल अरुंद असल्याने येथे वाहतूक कोंडी नेहमीच होत असते. त्यातच पुलावरील मार्गिकेवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पेव्हर ब्लॉक टाकून हे खड्डे बुजवले. मात्र, रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खडी व रेती वाहून जाऊन पेव्हर ब्लॉक उखडले गेले. याचा परिणाम सोमवारी दिवसभर दिसून आला.  खड्डय़ामुळे कोपरी पूल ते कॅडबरी जंक्शनपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. ही कोंडी कमी करण्यासाठी मुंबई-नाशिक मार्गिकेवरील एक  मार्गिका मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली होती. या कोंडीमुळे पाच मिनिटांच्या अंतरासाठी १५ ते २० मिनिटांचा अवधी लागत होता.

‘कोपरी पुलाजवळील रस्त्यावर पडलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. अपघात होऊ नये म्हणून त्या ठिकाणी रोधके लावण्यात आली. त्यामुळे उर्वरित मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली, अशी माहिती कोपरी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी दिली.