ठाणे शहरात सकाळी आणि दुपारी वाहतूककोंडी

ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून रविवारी मुंब्रा रेतीबंदर भागातील उन्नत मार्गिकेवर लोखंडी तुळई बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम रविवारी रात्री १२ या वेळेत पूर्ण झालेले नसल्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांना सोमवारी दिवसभर मुंब्रा बाह्य़वळण मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. त्यामुळे या मार्गावरील वाहनांचा भार ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, बाळकूम-साकेत मार्ग, खारेगाव-माजिवडा, ऐरोली टोलनाका ते रबाळे या मार्गाला बसून या ठिकाणी मोठी वाहतूककोंडी झाली होती. या कोंडीमुळे १० ते १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता. तसेच दुपापर्यंत ही वाहतूककोंडी कायम होती.

उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्या मोठी आहे. ही वाहने मुंब्रा बाह्य़वळणमार्गे वाहतूक करतात. मात्र, मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमधील उन्नत मार्गिकेवर शनिवारी रात्री १२ ते रविवारी रात्री १२ या वेळेत लोखंडी तुळई बसविण्यात येणार होती. त्यासाठी मुंब्रा बाह्य़वळण मार्ग २४ तास बंद ठेवून येथील वाहतूक ठाणे शहरातून वळविण्यात आली होती. त्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिसरात तैनात करून त्यांच्यामार्फत ही वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात येत होती. लोखंडी तुळई बसविण्याचे काम रविवारी वेळेत पूर्ण होईल, असे दावे संबंधित प्रशासनाकडून केले जात होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ठरलेल्या वेळेत हे काम पूर्ण झाले नाही आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांना सोमवारीही मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद ठेवून येथील वाहतूक ठाणे शहरातून वळवावी लागेल. त्यातच सोमवारी सकाळच्या वेळेत मुंबईला कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची वाहने रस्त्यावर आली. यामुळे ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, बाळकुम साकेत मार्ग, खारेगाव-माजिवडा, ऐरोली टोलनाका ते रबाळे या मार्गाला बसून वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारीही दुपापर्यंत मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद ठेवावा लागल्याने त्याचा वाहतूक व्यवस्थेवर झाल्याचे दिसून आले.

नोकरदार वर्गाचे हाल

सोमवारी सकाळी मुंबई तसेच नवी मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या नोकरदार वर्गाची वाहने एकाच वेळी रस्त्यावर आली. त्यातच मुंब्रा बाह्य़वळण बंद असल्याने या मार्गावरील वाहतूक ठाणे शहरातून वळविण्यात आली होती. सकाळच्या वेळेत अवजड वाहतूक रोखून धरण्यात आली  तरी इतर वाहनांची वाहतूक मात्र सुरू होती. त्यामुळे या वाहनांचा भार शहरातील रस्त्यांवर वाढला होता. त्यामुळे सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मुलुंड टोलनाका ते नितीन कंपनीपर्यंत तसेच बाळकूम साकेत मार्गावर साकेत ते कळवा नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी १० वाजेपर्यंत ही वाहतूक कोंडी कायम होती. तर, मुलुंड-ऐरोली टोलनाक्यावरही वाहनांच्या लांब रांगा लागल्या. यामुळ कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाचे हाल झाले.

वाहनचालकांचे हाल

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत वाहतुकीस परवानगी आहे. त्यामुळे रविवार सकाळपासून रोखून धरलेल्या अवजड वाहनांना दुपारी १२ वाजल्यानंतर हद्दीत प्रवेश देण्यात आला. मात्र, ही वाहने मुंब्रा बाह्य़वळण मार्ग बंद असल्याने ठाणे शहरातून वाहतूक करीत होती. त्यामुळे दुपारी नितीन कंपनी ते आनंदनगर जकातनाक्यापर्यंत वाहतूक  कोंडी झाली होती. तर, भिवंडीतून जेएनपीटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथून माजिवडय़ाच्या दिशेने सोडल्याने खारेगाव टोलनाका ते साकेत पुलापर्यंत वाहतूक  कोंडी झाली होती. दुपारी ३.३० वाजल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे वाहनचालकांचे हाल झाले.