विरार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावर रहदारीचा बोऱ्या; रिक्षाथांबा हटवण्याची मागणी

विरार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रस्त्यावर बेकायदा रिक्षाथांबा निर्माण झाल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता मुळातच निमुळता आणि अरुंद असल्यामुळे येथील रिक्षाथांबा हटवावा, अशी मागणी विरारकरांनी केली आहे.

विरार स्थानकाबाहेरील रिक्षाचालकांचे अतिक्रमण आणि त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी बनू लागली आहे. विरार स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला दोन्ही बाजूस निमुळते आणि अरूंद रस्त आहे. तिथे वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याने बेशिस्त आणि मनामानीपणे रिक्षा उभ्या असतात. त्याचा नागरिकांना त्रास होत असतो. त्यातच आता या ठिकाणी रिक्षाथांबे तयार करण्यात आले आहे. अर्नाळा-नवापूर येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या रिसॉर्टवर जाण्यासाठी दररोज मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांना नेण्यासाठी विरार पश्चिमेकडील गावठाणपर्यंत रिक्षाचालक शिरलेले असतात. विरार बसस्थानक आणि स्कायवॉकच्या खालीही दोन्ही बाजूला रिक्षा पार्क केल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते.

विरार जकातनाका ते ओलांडा या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला शालेय बस, गॅरेजच्या गाडय़ा, विक्रीसाठी ठेवलेली जुनी चारचाकी वाहने बेकायदा उभ्या केलेल्या असतात. मोठा  विरार जकातनाका येथे गेल्या वर्षी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली, मात्र या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्यामुळे अर्नाळा रिसॉर्टवर पर्यटकांना घेऊन जाणारे मुजोर रिक्षाचालक सर्रासपणे सिग्नल तोडत असतात. याचा त्रास नागरिकांना होत आहे. रिक्षाचालाकांवर कारवाई करावी, रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रिक्षा थांबे अन्यत्र हलवावे, अशी मागणी नागिरकांकडून होत आहे. बोळींज नाका या हमरस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना येथील रिक्षाथांबा उमराळा रस्त्यावर हलवण्याची मागणी करण्यात आली आहे.