अवजड वाहतुकीला वेळेचे बंधन; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

डोंबिवली/ ठाणे</strong> : कल्याण-शिळफाटा मार्गावर अवजड वाहनांना वेळेचे बंधन करण्यात आले असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालक, प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. या वेळेशिवाय इतर वेळी जर अवजड वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असेल तर त्यांच्यावर ठाणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अद्यापही उपनगरी रेल्वेगाडय़ांतून प्रवासबंदी आहे. त्यामुळे ठाणेपल्याड असलेल्या शहरांमध्ये राहाणारे हजारो नागरिक त्यांची खासगी वाहने घेऊन रस्ते मार्गाने मुंबईत ये-जा करत असतात. त्यात एसटी आणि कंपन्यांच्या बसगाडय़ांचाही सामावेश असतो. या वाहनांचा मोठा भार रस्ते मार्गावर आला आहे. कल्याण-शिळफाटा मार्गावर रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. टाळेबंदीतील निर्बंध शिथिल झाल्यामुळे उद्योगांना धुगधुगी येऊ लागली आहे. त्यामुळे अवजड वाहनांचाही या मार्गावर भार वाढू लागला आहे. वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार रात्री १० ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत अवजड वाहनांना शहरात परवानगी आहे. असे असताना या वेळेशिवाय छुप्या पद्धतीने हजारो अवजड वाहने कल्याण-शिळफाटा मार्गावरून ये-जा करत आहेत. या सर्व प्रकारांमुळे मुंबईतून पुन्हा घरी परतणाऱ्यांना सुमारे दीड ते दोन तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याचे चित्र आहे.

शिळफाटा रस्त्यावरून अवजड वाहने रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत सोडण्यात यावीत, अशी वाहतूक विभागाची अधिसूचना असताना संध्याकाळी सहा वाजल्यापासून या रस्त्यावर अवजड वाहने कशी धावतात, अशी विचारणा मध्यंतरी या भागातील मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली होती. चार दिवसांपूर्वी शिळफाटा चौकात जाऊन तेथील वाहतूक अधिकाऱ्यांना आमदारांनी फैलावर घेतले होते. तसेच यापुढे एकही अवजड वाहन रात्री १० वाजण्याच्या आत शिळफाटा रस्त्यावर दिसता कामा नये, अशी सूचना नवी मुंबई, ठाणे विभागाच्या वाहतूक अधिकाऱ्यांना केली होती. या सूचनेची आता अंमलबजावणी होऊ लागली आहे.

शनिवारपासून रात्री १० वाजण्याच्या आत एकही वाहन शिळफाटा रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून सोडण्यात येत नाही. ठरावीक वेळेशिवाय आलेली अवजड वाहने तळोजा, खोणी, दहिसर मोरी भागांत रस्त्याच्या कडेला थांबवली जात आहेत. त्यामुळे मागील अनेक महिने वाहतूक कोंडीच्या गर्तेत असलेला शिळफाटा दोन दिवसापासून मोकळा श्वास घेऊ लागला आहे.

रहिवाशांकडून पाळत

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर सायंकाळी वाहतूक पोलिसांची नजर चुकवून अवजड वाहन रस्त्यावर आले तर त्यावर डोंबिवलीतील कार्यकर्ते राजेश कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाळत ठेवली आहे. आडमार्गाने शिळफाटा रस्त्यावर आलेल्या अवजड वाहनांचा पाठलाग करून हे कार्यकर्ते त्या वाहनांना अडवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात देत आहेत.

जूनपासून दुचाकीवरून मुलुंड येथे नोकरीसाठी जातो. शिळफाटा मार्गे जात असल्याने दररोज या रस्त्यावरील वाहनकोंडीचा त्रास होता. मागील दोन दिवसांपासून या रस्त्यावर दिसणारी अवजड वाहने दिसेनाशी झाली आहेत. त्यामुळे कल्याण फाटा ते डोंबिवलीत येण्यासाठी आता २५ मिनिटे लागतात. अशाप्रकारचे नियोजन यापुढे वाहतूक पोलिसांनी करावे.

कैलास तळेले, प्रवासर

अवजड वाहने हेच शिळफाटय़ावरील कोंडीचे खरे कारण होते. वाहतूक विभागाकडून त्यांच्या अधिसूचनेचे पालन होत नव्हते. त्या अधिसूचनेची आपण फक्त वाहतूक अधिकाऱ्यांना जाणीव करून दिली. त्याचा परिणाम आता शिळफाटा कोंडीमुक्त होण्यासाठी झाला आहे.

प्रमोद पाटील, आमदार