04 March 2021

News Flash

रेल्वे स्थानक परिसरात वाहतुकीचा बोऱ्या

कल्याणात ठाणे शहरासारखा एकच व अधिकृत असे रिक्षा वाहनतळ नाही,

कल्याण रेल्वे टर्मिनस होणार, असे स्वप्न दाखवत प्रत्यक्षात शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम रेल्वे प्रशासनाने केले आहे. हे टर्मिनस विकसित झाले असते तर रेल्वे स्थानक परिसराचा चारही बाजूने विकास झाला असता. आज रेल्वे स्थानक परिसर वाहने, वाहतूक कोंडीने गुदमरला आहे. तो किमान गुदमरलेपणातून मोकळा झाला असता. कल्याण शहराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे कल्याण पश्चिम परिसरातील गलिच्छ रेल्वे स्थानक परिसर.
कल्याण पश्चिम फलाट क्रमांक एकबाहेरील रेल्वे स्थानक परिसर कल्याणकरांसाठी अनेक वर्षांपासून दुखणे बनले आहे. अनधिकृत रिक्षा थांबे, रिक्षा चालकांची मुजोरी, रस्त्याच्या कडेला कचराकुंडय़ा, तेथेच बस थांबे, स्कायवॉक, फेरीवाले, वाहतूक कोंडी या व अशा विविध समस्यांमुळे कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसर नेहमी चर्चेत असतो. ‘नजर जाईल तिथे रिक्षा आणि अनधिकृत रिक्षा थांबे’ या समीकरणाचे दर्शन कल्याण रेल्वे स्थानक परिसरात होते. कल्याणात ठाणे शहरासारखा एकच व अधिकृत असे रिक्षा वाहनतळ नाही, जेणेकरून शहरातील विविध भागांत प्रवाशांना एकाच ठिकाणहून रिक्षा मिळण्याची सोय उपलब्ध होईल.
अधिकृत रिक्षा थांब्यांमध्ये खडकपाडा, बेतुरकरपाडा, लाल चौकी या कल्याणातील विभागांत जाण्यासाठीच्या उल्हासनगर परिसरात जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या थांब्यांचा समावेश आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरांतच बस स्थानकही आहे. बस स्थानकाच्या बाहेरच मेट्रो मॉल, डोंबिवली या ठिकाणी जाणाऱ्या रिक्षा रस्ते अडवून उभ्या असतात. तेथेच काही अंतर सोडून भिवंडी येथे जाणाऱ्या रिक्षांचा गराडा असतो. यामुळेच बस स्थानक परिसरात खासगी वाहने, बाहेर गावासाठी जाणाऱ्या बसेस, विविध विभागांत जाण्यासाठी निघालेल्या रिक्षा एकत्रित आल्यामुळे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. अनधिकृतपणे या ठिकाणी रिक्षाचालक आपल्या रिक्षा उभ्या करून होणाऱ्या वाहतूक कोंडीची मजा लुटत असतात. दुसरीकडे सिंधिगेट, बिर्ला महाविद्यालय, फाटक (शहाड) येथे जाणाऱ्या अनधिकृत रिक्षा थांब्यांमुळे वाहतूक कोंडी होते.
पालिका अधिकारी, आरटीओ, वाहतूक विभाग हा गंभीर प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरली आहेत. चार वर्षांपूर्वी पालिकेच्या एका सर्वोच्च पदाधिकाऱ्याने शहरातील वाहतूक कोंडी प्राधान्याने सोडविणार असल्याची भलीमोठी घोषणा केली होती. ती हवेतच विरली. आपण केलेल्या घोषणेची पुढे अंमलबजावणी व्हावी म्हणून कधी या पदाधिकारीने सर्वसाधारण सभेत आवाज उठविला नाही. भाजपचे आमदार नरेंद्र पवार रेल्वे स्थानक भागातील ही कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण त्यांच्याही आदेशाचे सर्वच अधिकारी तात्पुरते पालन करतात. नऊ दिवस उलटल्यावर पुन्हा गजबजाट सुरू होतो. नगरसेवक, आमदार, खासदार या सगळ्यांची राजकीय उदासीनता नागरिकांना वाहतूक कोंडीचे चटके देत आहे.

रेल्वे स्थानक परिसर म्हणजे नरकपुरी झाला आहे. या भागातून जाताना दुर्गंधी, दलदल, वाहतूक कोंडी यांचा सामना करावा लागतो. पालिका, पोलीस, आरटीओ, रेल्वे पोलीस इतक्या सक्षम यंत्रणा शहरात कार्यरत आहेत, तरीही या यंत्रणा रेल्वे भागातील भागातील दुर्दशा दूर करू शकत नाहीत.
– अशोक टरपले, कल्याण

कल्याण पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत रिक्षा वाहनतळ आहेत. ते प्रथम पोलीस, आरटीओ आणि पालिकेने हटविले पाहिजेत. बेकायदा वाहनतळ, रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या रिक्षा या शहराची मोठी डोकेदुखी आहे. रेल्वे स्थानक भागातील अनधिकृत वाहनतळ बंद करणे गरजेचे असून केवळ अधिकृत वाहनतळ सुरू करावे. रस्त्यावरील रिक्षांची संख्या घटल्याने वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होईल.
– नम्रता चौगुले, कल्याण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 12:17 am

Web Title: traffic deadlock at kalyan railway station area
Next Stories
1 बेकायदा बांधकाम नगरसेवकांच्या अंगाशी?
2 पाणीकपातीची घटिका लांबणीवर!
3 दगाबाजी आवरा, मगच युतीचे बोला
Just Now!
X