विटाव्यापासून खाडीपुलापर्यंत वाहनांच्या रांगा

नवीन खाडीपुलाच्या उभारणीच्या कामांमुळे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कळवा परिसरातील वाहतूक कोंडीला सामोरे जाणाऱ्या वाहनांना मंगळवारी दुपारी अक्षरश: ‘ब्रेक’ लागला. कळवा खाडीवरील विद्यमान पुलावर एक मालवाहू ट्रक बंद पडल्याने ठाणे तसेच नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. साकेत परिसरातही कोंडी झाल्याने तेथून रेल्वे स्थानकाच्या दिशेने येजा करणारे प्रवासी या कोंडीत अडकून पडले होते.

माटुंगा येथे रेल्वे प्रशिक्षणाथीर्र्नी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केल्यामुळे मध्य रेल्वे काही काळ ठप्प होती. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी निघालेल्या ठाणेकरांनी कार्यालयांकडे जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने पुन्हा घरची परतीची वाट पकडली. यासाठी रिक्षा आणि बसचा आधार घेतल्याने वाहनांच्या गर्दीत भर पडली होती. त्यातच दुपारी बाराच्या सुमारास कळव्याहून ठाण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक कळवा पुलावर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडला. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. पुलावरील मुख्य जागेवर मध्यभागीच बंद पडलेल्या या ट्रकमुळे पाठीमागून येणारी वाहने तासन्तास एकाच ठिकाणी खोळंबून होती.

याच ठिकाणी नव्या खाडीपुलाचे काम सुरू असल्याने मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुलाचे काम तसेच विटावा कळवा पुलावर मंदगतीने सुरू असलेले काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत. असे असले तरी मंगळवारी ट्रक बंद पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडीच्या समस्यांवर उपाययोजना करणे गरजेचे असतानाही कोणत्याही प्रकारचे नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत नाही. या प्रकरणी कळवा विभागाचे वाहतूक पोलीस अधिकारी मनोहर आव्हाड यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.