News Flash

एक रस्ता बंद.. शहरभर कोंडी!

ठाण्यातील दगडी शाळा परिसरात महापालिकेने भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू केल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. जांभळी नाका,

| July 7, 2015 04:41 am

ठाण्यातील दगडी शाळा परिसरात महापालिकेने भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम सुरू केल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. जांभळी नाका, राम मारुती मार्ग, गोखले मार्गावर यामुळे वाहनांच्या मोठमोठय़ा रांगा दिसू लागल्या आहेत. या सर्व परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी खास कुमक तैनात केली असून त्यानंतरही ही कोंडी होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
टेंभी नाका तसेच रेल्वे स्थानकाच्या दिशेने चरई, अल्मेडा चौक तसेच महापालिकेच्या दिशेने जाण्यासाठी वाहन चालकांकडून दगडी शाळेलगत असलेल्या रस्त्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. तीन पेट्रोल पंप तसेच राम मारुती मार्गाकडून टेंभी नाका, चरई परिसरात जाण्याकरिता हा रस्ता वापरात आणला जातो. गेल्या काही दिवसांपासून भूमिगत मलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी हा रस्ता खोदण्यात आल्याने मूळ शहरातून इतरत्र जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद झाल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
वाहतूकीचे नियोजन करण्यासाठी जागोजागी पोलीस नेमण्यात आले असले तरी मूळ शहरातील अंरुद रस्त्यांच्या रचनेमुळे ही कोंडी टाळणे कठीण होत असल्याने वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मान्य केले. दगडी शाळेजवळ वाहिन्या टाकण्याचे काम आठवडाभरात पूर्ण केले जाईल, असा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अभियंत्याने केला.

’दगडी शाळेजवळील रस्ता कामासाठी बंद ठेवण्यात आल्याने गडकरी नाटय़गृह, तलावपाळी परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
’या मार्गावरुन जाणारी वाहने गडकरी नाटय़गृहालगत असलेल्या रस्त्यावरुन न्यू इग्लिश स्कूल येथून राम मारुती मार्गावर वळविण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावरही वाहनांची कोंडी होत आहे.
’काही वाहनांचा भार गोखले मार्गावर पडू लागल्याने सकाळच्या वेळेत रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी या भागात होऊ लागली आहे.
’वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना माहिती व्हावी यासाठी टेंभी नाका तसेच जांभळी नाका परिसरात ठिकाठिकाणी यासंबंधीचे फलक लावले आहेत.
’वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांची खास कुमकही या भागात नेमण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2015 4:41 am

Web Title: traffic deadlock in thane city
Next Stories
1 संधी चालून येत नाहीत, त्या शोधाव्या लागतात!
2 ठाणे शहरबात या शाळेला शिस्त नाही..
3 ठाणे.. काल, आज, उद्या
Just Now!
X