अवजड वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता

मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पुलाच्या कामामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडीचा परिसर कोंडीच्या गर्तेत सापडला असतानाच दिवाळीच्या तोंडावर उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरातून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने ठाण्यावर पुन्हा महाकोंडीचे संकट घोंगावू लागले आहे.

दिवाळीच्या तोंडावर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह विविध प्रकारच्या भेटवस्तूच्या खरेदीला बाजारात मोठी मागणी असते. भिवंडीतील गोदामांमध्ये या वस्तूंचा अतिरिक्त साठा करण्याची लगबग सुरू झाली असून त्यामुळे बंदरातून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या संख्येत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वाहतूक पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या वाढणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्याची लगबग सध्या वाहतूक पोलिसांकडून सुरू झाली आहे.

ठाणे, भिवंडी तसेच आसपासच्या शहरात होणारी कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी एक बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. उरणच्या जेएनपीटी आणि तलासरी भागात पार्किंग यार्ड उभारण्याचे आदेशहीदेण्यात आले होते. प्रत्यक्षात अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे महाकोंडीचे संकट अधिक गहिरे होण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन महिन्यांपासून ठाणे, भिवंडी तसेच आसपासच्या शहरातील महामार्गावर अवजड वाहतुकीचा भार वाढल्याने वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. मात्र तात्पुरत्या उपायांमुळे ही कोंडी कमी झाली आहे.

पालकमंत्र्यांच्या आदेशाकडे कानाडोळा

ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीस दिवसांपूर्वी एक बैठक घेतली होती. त्यामध्ये उरणच्या जेएनपीटी बंदरातून भिवंडीतील गोदामांच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण राहावे म्हणून ठाणे व नवी मुंबई वाहतूक पोलिसांचा संयुक्त नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते, तसेच उरणच्या जेएनपीटी आणि तलासरी भागात पार्किंग यार्ड उभारण्याचे आदेश दिले होते. भिवंडी येथील गोदामांना आठवडय़ाचे सातही दिवस विभागून सुटी देण्याचे तसेच दोन पाळ्यांमध्ये गोदामांमध्ये काम करण्याचे निर्देश दिले होते. या सर्व आदेशाची प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी झालेली नाही.

वाहनांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

दिवाळीनिमित्त भेटवस्तू तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीला बाजारात मोठी मागणी असल्याने भिवंडीतील गोदामांमध्ये त्यांचा अतिरिक्त साठा करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी उरणच्या जेएनपीटी बंदरातून भिवंडीतील गोदामांपर्यंत तसेच गोदामातून अन्य भागात मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असा वाहतूक पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर या शहरांवर अवजड वाहतुकीचा भार वाढणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना आखण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली.