कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सीमेंट रस्ते तसेच भूमिगत वाहिन्या टाकण्याची कामे येत्या १५ मेपर्यंत उरका, अशा स्पष्ट सूचना वाहतूक विभागाने महापालिकेला दिल्या आहेत. यासंबंधीची कामे गेल्या चार वर्षांपासून सुरू असल्याने शहरातील रस्ते जागोजागी खोदून ठेवण्यात आले आहेत. ही कामे ठेकेदार वेळेत पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मागील आठ महिने नागरिक रस्ते खोदाई आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कोंडीमुळे हैराण झाले आहेत. किमान पावसाळ्यात नागरिकांची या जाचातून मुक्तता व्हावी, यासाठी वाहतूक विभागाने येत्या १५ मेपर्यंत ठेकेदारांना खोदाईसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेतून कामाचे आदेश मिळाल्यानंतर ठेकेदार स्थानिक वाहतूक विभागाकडून रस्ते खोदण्यासाठी ‘ना हरकत’ दाखला मिळवतात. स्थानिक वाहतूक अधिकारी आपल्या विभागाचा विचार करून ठेकेदाराला रस्ते खोदण्यासाठी परवानगी देतात. यावेळी शहरातील एकत्रित वाहतूक नियोजनाचा फारसा विचार केला जात नाही, असे निदर्शनास आले आहे. या परवानगीमुळे अन्य भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होईल का याचाही विचार केला जात नाही. एकाच वेळी शहराच्या चहुबाजूंनी  रस्ते खोदण्याची कामे सुरू झाल्याने गेल्या काही वर्षांपासून रहिवाशांचे हाल सुरू आहेत. महापालिका हद्दीत दोन वर्षांपूर्वी रस्ते खोदण्यासाठी ज्या परवानग्या दिल्या होत्या, त्यापैकी बरीचशी कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.   
या पाश्र्वभूमीवर, येत्या १५ मेपर्यंत शहरातील प्रमुख मार्गावरील खोदकामे उरकावीत, अशा स्पष्ट सूचना महापालिकेस देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्याने दिली. रस्त्यांची कामे तसेच भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक असलेली खोदकामे करण्यासाठी १५ मेपर्यंतची मुदत निश्चित करण्यात आली आहे. ३१ मेपर्यंत शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत असतील यासाठी वाहतूक विभाग प्रयत्नशील असणार आहे. अगदी अत्यावश्यक कामाशिवाय पावसाळ्यात रस्त्यावर खोदकामाला परवानगी देण्यात येणार नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त (वाहतूक) डॉ.रश्मी करंदीकर यांनी दिली.