06 March 2021

News Flash

कोंडीचा कळवा नाका!

एरवी वाहनांच्या वर्दळीमुळे सदैव गजबजलेल्या कळवा नाका येथील चौकात सध्या भीषण कोंडी होऊ लागली आहे.

विटावा येथे दोन पदरी मार्गिकांवर आल्यावर कळवा चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी

पुलाचे बांधकाम, अवजड वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक सदैव विस्कळीत

ठाणे : एरवी वाहनांच्या वर्दळीमुळे सदैव गजबजलेल्या कळवा नाका येथील चौकात सध्या भीषण कोंडी होऊ लागली आहे. नवी मुंबईहून चारपदरी मार्गिकांवरून येणारी वाहने विटावा येथे दोन पदरी मार्गिकांवर आल्यावर कळवा चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यात या मार्गावर पुलाची कामे सुरू असल्याने अवघ्या दहा मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनांना पाऊण तास घालवावा लागत आहे.

ठाणे आणि कळवा परिसरात तिसऱ्या नव्या कळवा पुलाचे काम सुरूआहे. मात्र बांधकामादरम्यान उभारलेल्या खांबांच्या गर्दीमुळे ऐन कळवा पुलाच्या चढणीवरच वाहतूक कोंडी होते. तसेच बांधकामासाठी उभारण्यात आलेले खांब हे ठाण्याच्या दिशेने जाताना कळवा पुलाच्या चढणीदरम्यानच आहेत. त्यामुळे नवी मुंबईहून येणाऱ्या वाहनचालकांना ठाण्याच्या दिशेने जाताना बांधकामासाठी उभारण्यात आलेल्या खांबांना मोठा वळसा घालून कळवा पुलावर जावे लागते. या दरम्यान वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी होते. कळवा पुलावरही वाहतूक कोंडीची समस्या कायम राहते. गेल्या महिन्यात मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या मार्गिकेला पर्याय असणाऱ्या कळवा-विटावा या मार्गावरही गेल्या महिनाभरापासून वाहतुकीचा भार वाढल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. कळवा पूल हा ठाणे तसेच नवी मुंबई यांना जोडणारा मुख्य पूल समजला जातो. तसेच या मार्गाला पर्याय म्हणून ऐरोली पूलही आहे. मात्र ऐरोली पुलावर पथकर नाका असल्याने तेथील कर चुकवण्यासाठी अनेक वाहनचालक हे कळवा-विटावा या मार्गाचा अवलंब करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेही या मार्गावर वाहतूक कोंडी होते.

नवी मुंबई ते विटावा मार्गापर्यंतचे रस्ते हे चारपदरी आहेत. मात्र विटावा ते कळवा पूल या मार्गावरील रस्ते हे दोन पदरी आहेत. कळवा आणि विटावा मार्गावर एका वेळेस फक्त एकच वाहन पुढे जाऊ शकते. त्यामुळे या मार्गावर कायम वाहतूक कोंडी असते. कळवा साकेत मार्गावरही अशाच प्रकारची वाहतूक कोंडी दररोज होते. साकेत मार्गावरून वाहतूक कोडींची समस्या लक्षात घेता या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र येथून अवजड वाहने सर्रास मार्गक्रमण करताना दिसतात. येथे तैनात असलेल्या वाहतूक कर्मचाऱ्यांचे खिसे ओले करून अवजड वाहने पुढे सरकतात. मात्र, कळवा येथील चौकात वाहतूक कोंडीमध्ये ही वाहने अडकल्यानंतर संपूर्ण परिसरातील वाहतूक ठप्प होते. साकेत आणि कशेळी येथून कळव्याच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या ही अधिक आहे. त्यामुळे कळव्याच्या दिशेने जाणाऱ्या ठाण्यातील अनंत कान्हेरे चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. कोपरी भागातून सिडको बस डेपोमार्गे कळव्यात जाणाऱ्या वाहनांना कळवा चौकात सुरू असलेल्या कामामुळे पोलीस आयुक्तालय चौकात खोळंबून राहावे लागते. तसेच ठाणे शहरातून कळव्याच्या दिशने जाणाऱ्या वाहनांचा लोंढा हा सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस अधिक असल्याने वाहनांच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे अनेक वाहने विटावामार्गे ठाण्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे वाहतुकीचा लोंढा हा कळवा परिसरात वाढला आहे. कळवा येथील शिवाजी रुग्णालयाच्या परिसरात पुलाचे काम सुरूअसल्यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वाहनचालक ऐरोली मार्गावरील पथकर चुकवण्यासाठी कळवा विटावा या मार्गाचा अवलंब करीत आहेत. आमच्यातर्फे वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न अहोरात्र सुरू आहेत.

– मनोहर आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा वाहतूक शाखा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2018 1:44 am

Web Title: traffic dilemma at kalwa naka
Next Stories
1 प्रक्रियाकृत रासायनिक सांडपाणी थेट खाडी पात्रात
2 धबधब्यांभोवती सुरक्षा कवच!
3 शाळेसमोर कचराभूमी
Just Now!
X