ठाणे, भिवंडी, कल्याण तसेच आसपासच्या शहरांतील वाहतुकीचा शास्त्रीय पद्घतीने सविस्तर अभ्यास करून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करता यावे, यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी कल्याण शहरामध्ये वाहतुकीचे संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. या नव्या केंद्रात ठाण्यासह राज्यातील वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देण्यासोबत वाहतुकीचा शास्त्रोक्त अभ्यास कसा करावा, याचे धडेही दिले जाणार आहेत. त्यामुळे वाहतुकीत सुव्यवस्था आणण्यासाठी हे केंद्र केवळ ठाणे जिल्हाच नव्हे, तर अवघ्या राज्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याण तसेच आसपासच्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून त्यामुळे या शहरांमधील वाहनांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. तसेच या शहरातील बहुतेक रस्ते अरुंद असून त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. याशिवाय वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्याचे परिणाम शहरांच्या वाहतूक व्यवस्थेवर दिसू लागले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीस शहरातील वाहतूक मार्गावर बदलांचे प्रयोग राबवीत आहेत. मात्र, हे प्रयोग शास्त्रोक्त अभ्यास वा सर्वेक्षणातून राबवण्यात येत नसल्याने अनेकदा ते फसून वाहतूक कोंडीत भरच पडते. वाहतुकीचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यात संशोधन व प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नाही. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी कल्याण शहरामध्ये वाहतुकीचे संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे हा
प्रस्ताव मान्यतेसाठी सादर केला आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.

कचोरे गावात संशोधन केंद्र
कल्याण येथील कचोरे गावात वाहतूक शाखेकरिता सुमारे १२ गुंठे जागा आरक्षित असून तिथे वाहतूक संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच वाहतूक उद्यान उभारण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे सादर केला आहे. या केंद्रात वाहतूक पोलिसांना शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच उद्यानात वाहतुकीसंबंधी चिन्हे व निशाणी लावण्यात येणार असून तिथे राज्यातील विद्यार्थ्यांनाही वाहतूक नियमांविषयी माहिती देणे शक्य होणार आहे.

राज्यातील दुसरे केंद्र
मुंबईतील भायखळा परिसरात अशा स्वरूपाचे राज्यातील एकमेव संशोधन केंद्र असून तिथेच राज्यातील वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येते. त्याच धर्तीवर कचोरे गावात अद्ययावत संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव असून त्यामध्ये इमारतीत कॉन्फरस रूम, वरिष्ठ अधिकारी कार्यालय, कॅन्टीन, परेडसाठी मैदान आदी असणार आहे. या केंद्रात ठाण्यासह राज्यातील वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देणे शक्य होणार असून त्यांना राहण्यासाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे.