महत्त्वाच्या नाक्यांवर बाहेरगावी जाणाऱ्या बसचे थांबे;  तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शनवर वाहतूक विस्कळीत

मुंब्रा बावळण रस्ता बंद झाल्यापासून ठाण्यातील रस्त्यांवर वाढलेली कोंडी तापदायक ठरत असतानाच बाहेरगावी जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या बसगाडय़ांनी यात भर पाडली आहे. तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी या जंक्शनवर गेल्या काही दिवसांपासून ट्रॅव्हल बसनी थांबा घेण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी लागणाऱ्या बसच्या रांगेमुळे येथील रस्ता व्यापला जात असून येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी या जंक्शनांच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर सायंकाळी या खासगी बसगाडय़ा उभ्या राहू लागल्या आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, गोवा या जिल्ह्य़ांच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक या खासगी ट्रॅव्हल्स बसगाडय़ांतून करण्यात येते. कुर्ला, घाटकोपर,मुलुंड या ठिकाणांहून या खासगी बसगाडय़ा प्रवाशी घेत ठाण्याच्या दिशेने येतात. त्या या चौकांत उभ्या राहतात. एकावेळी तीन-चार अशा संख्येने उभ्या राहणाऱ्या या बसगाडय़ांमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. मल्हार सिनेमा, लाल बहादूर शास्त्री मार्ग, महापालिका मार्ग, खोपट या ठिकाणांहून येणाऱ्या वाहनांना तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी येथील ऐन वळणांवर उभ्या राहणाऱ्या या बसमुळे अडथळा येत आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील लुईसवाडीच्या दिशेने जाणाऱ्या ऐन वळणाच्या ठिकाणीदेखील मोठय़ा प्रमाणावर खासगी बसगाडय़ा उभ्या राहिल्याचे पाहायला मिळत आहे. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी या बसगाडय़ा प्रवाशी घेण्यासाठी उभ्या राहत असल्याने याचा नाहक त्रास इतर प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

चार महिन्यांपासून तीन हात नाका – नितीन पूल ज्या ठिकाणी सुरू होतो त्या भागात लुईस वाडीच्या दिशेने जाणाऱ्या डाव्या वळणाच्या हरितपथावर लांब पल्ल्याच्या खासगी बसगाडय़ांच्या तिकीट नोंदणीचे कार्यालय थाटण्यात आले आहे. मात्र या टपरी वजा कार्यालयावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेतील टी सर्कलजवळ कर्तव्यावर असलेले नामदेव ठाकरे या वाहतूक पोलिसावर दुचाकी चढवून जखमी केल्याप्रकरणी तसेच त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पूर्व विभागातील टी सर्कल येथे वाहतूक शाखेचे पोलीस नाईक नामदेव ठाकरे आणि त्यांचे सहकारी कर्तव्य बजावत असताना त्यांनी एका रिक्षाचालकावर दंड भरण्यासाठी कारवाई केली. मात्र त्या रिक्षाचालकाने त्याच्या सहकाऱ्याला बोलवत पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी रिक्षाचालकाचा सहकारी साहिल देशपांडे याने दुचाकी वाहतूक पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न केला. तसेच शिपायाच्या सहकाऱ्याच्या पोटावर लाथ मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नंतर ठाकरे यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी नामदेव ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी साहिल देशपांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांब पल्ल्याची प्रवाशी वाहतूक करणाऱ्या या खासगी बसगाडय़ांना अधिकृत प्रवाशी घेण्याचा थांबा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेने हस्तक्षेप करून त्यांच्यासाठी विशिष्ट जागा ठरवून द्यायला हवी. संध्याकाळच्या वेळेस दुहेरी मार्गिकेवर ही वाहने आल्यास वाहतूक  शाखेतर्फे या बसगाडय़ांवर कारवाई होत आहे.

– अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे वाहतूक शाखा