News Flash

अपघात, वाहन बिघाडामुळे कोंडी

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपुलांची उभारणी होत असली, तरी कोंडीची समस्या मात्र अधिकाधिक गंभीर होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ऐन गर्दीच्या वेळी ठाणेकरांची रखडपट्टी; मेट्रोच्या कामामुळे समस्येत भर

ठाणे शहरातील रस्त्यांना वाहतूक कोंडीचा विळखा कायम असताना शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कापूरबावडी भागात झालेला अपघात आणि वाहन बंद पडण्याच्या घटनेमुळे घोडबंदर रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली. या कोंडीचा फटका माजीवाडा, कापूरबावडी, पातलीपाडय़ाकडे जाणाऱ्यांना आणि ठाणे स्थानकाकडे येणाऱ्यांनाही बसला. मेट्रो मार्गाचे काम सुरू असल्याने अरुंद झालेल्या रस्त्यांवरून मार्ग काढणे वाहनचालकांसाठी कठीण झाले होते.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपुलांची उभारणी होत असली, तरी कोंडीची समस्या मात्र अधिकाधिक गंभीर होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) तसेच रस्ते विकास महामंडळाकडून घोडबंदर मार्गावर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांवरील वाहनांचा भारही कमालीचा वाढला आहे. शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कापूरबावडी उड्डाणपुलावर ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ट्रक आणि एका चारचाकी वाहनाची धडक झाली. अपघातग्रस्त वाहने हटवण्यास विलंब झाला. त्यानंतर वाहने क्रेनच्या साहाय्याने उड्डाणपुलावरच बाजूला उभी करण्यात आली. त्यामुळे रस्त्यावर खोळंबलेल्या वाहनांना पुढे जाण्यासाठी अरुंद मार्गिका शिल्लक राहिली. त्यामुळे कापूरबावडी उड्डाणपुलावर वाहतुकीचा बोजवारा उडाला आणि ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली.

घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कापूरबावडी भागात ट्रक बंद पडला. भर रस्त्यात बंद पडलेला ट्रक बाजूला हटवण्यास विलंब झाल्याने पातलीपाडा येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या.

माजीवाडा पुलावरही काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे खारेगाव पथकर नाका भागातून माजीवाडा पुलावर जाणाऱ्या नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली. या सर्व घोळामुळे कार्यालयाकडे निघालेले अनेक कर्मचारी तब्बल एक तासाहून अधिक काळ कोंडीत खोळंबून राहिले.

मुख्य मार्गावर कोंडीची शक्यता

नाताळच्या सुट्टीमुळे बाहेरगावी पर्यटनासाठी निघणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने ठाणे शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता ठाणे वाहतूक पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. शनिवार, रविवार असल्याने आणि शाळांना नाताळची सुट्टी लागल्याने अनेक प्रवासी खासगी वाहने घेऊन बाहेर जातील, परिणामी शहराच्या बाहेर जाणाऱ्या मार्गावर अधिक गर्दी होऊ शकेल, असा अंदाजही वाहतूक विभागाने वर्तवला आहे.

सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कापूरबावडी भागात वाहन बंद पडल्यामुळे आणि अपघातांमुळे काही काळ कोंडी झाली होती. मात्र संबंधित भागातील वाहतूक शाखेतर्फे कोंडी सोडवण्याचे काम तातडीने करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

– अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे वाहतूक शाखा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 2:14 am

Web Title: traffic due to accident vehicle disruption
Next Stories
1 राम मराठे महोत्सवाला पुढील वर्षी कात्री?
2 ठाण्यातील बाजारांत नाताळचा उत्साह
3 फुगे, चिरोटे, उंबरे आणि शिंगोळय़ा!
Just Now!
X