विरार रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असून याचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना होऊ लागला आहे. वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

दररोज हजारो प्रवासी विरार स्थानकात ये-जा करतात. मात्र रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. स्थानक परिसरात रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असते.

विरार पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी बेशिस्त रिक्षाचालकांची समस्या भेडसावत आहेत. मुळात येथील रस्ते अरुंद असून त्यात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यात रिक्षाचालकांची भर पडलेली आहे. यापैकी अनेक रिक्षा अनधिकृत आहेत. रिक्षाथांब्यावर प्रवासी न भरता ते मधूनच प्रवासी भरतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. रिक्षा एकाच रांगेत उभ्या न करता तीन ते चार रिक्षा रस्त्यातच सलग उभ्या असतात. यामुळेही इतर वाहनांच्या आणि नागरिकांच्या मार्गात अडथळा निर्माण होत असतो.

वाहतूक पोलीस मात्र वाढते शहरीकरण, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि खुले झालेले रिक्षा परमिट यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या असल्याचे सांगतात. ‘सरकारने रोजगारासाठी रिक्षाचे परमिट द्यायचे मंजूर केल्यापासून रिक्षाचालकांचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्यामुळे नियंत्रण ठेवणे कठीण जाते,’ असे वसई वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांना इतर ठिकाणी कर्तव्य आल्यामुळे सगळीकडे लक्ष देणे कठीण असते, असेही त्यांनी सांगितले. रिक्षांचे प्रमाण वाढत चालले आहे, पण रस्ते तेवढेच आहेत. रस्ते आधीपासून इतके लहान आहेत, त्यात फेरीवाले रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांना जागा नसल्यामुळे वाहतूक कोंडी जास्त होते, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.