ठाणे तसेच आसपासच्या शहरांना गेल्या काही वर्षांपासून भेडसावणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वरवरचे उपाय केले जात आहेत. शहरातील अंतर्गत रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे कोंडी होणे स्वाभाविक आहे असे जाणकारांचे म्हणणे असले तरी पूर्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या चौकांनी या शहराची खरी कोंडी केली आहे. ठाणे आणि कळव्याला जोडणारा जंक्शन चौक असो अथवा जुन्या आणि नव्या ठाण्याला जोडणारा नितीन चौक तसेच तीन हात नाका असो. येथील कोंडीवर उतारा शोधण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांना अजूनही योग्य मार्ग सापडलेला नाही.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक पोलिसांकडून केले जाणारे वरवरचे उपाय अधिक गुंतागुंतीचे ठरण्याची चिन्हे आहेत. ठाणे शहरातील सर्वच मार्गाचा तसेच वाहतुकीचा शास्त्रीय पद्घतीने अभ्यास करणे गरजेचे असून त्याआधारेच शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या उग्र रूप धारण करू लागली असतानाही महापालिकेकडून वाहतुकीचा शास्त्रीय पद्घती अभ्यास होताना दिसून येत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या भविष्यात बिकट होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे तसेच आसपासच्या शहरांना वाहतूक कोंडीचा विळखा बसला आहे. मुंबईला खेटूनच असलेल्या ठाणे शहरातून मुंबई-अहमदाबाद असे मुख्य मार्ग जात असून तेथून दररोज वाहनांची मोठय़ा प्रमाणात ये-जा सुरू असते. या वाहनांचा आकडा मोठा असल्याने शहरातील वाहतुकीवर त्याचा प्रचंड ताण पडत आहे. शहरातील महामार्गावर वाहतूक कोंडी झाली तर त्याचे परिणाम अंतर्गत रस्त्यांवर होताना दिसून येतात. भविष्यात वाहनांच्या संख्येत होणारी वाढ आणि त्या तुलनेत रस्ते तसेच उड्डाणपुलांचे नियोजन पूर्वीच करणे गरजेचे होते. मात्र, ‘तहान लागल्यानंतर विहीर खोदायची’ या उक्तीप्रमाणे शहरात गरजेप्रमाणे महामार्गावर उड्डाणपूल उभे राहिले; परंतु शहरांमध्ये वाहनांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागल्याने रस्ते तसेच उड्डाणपूल अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळेच वाहतुकीची समस्या प्रकर्षांने जाणवू लागली आहे. रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. तसेच वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी ठरू लागल्याने वाहतूक पोलीस शहरातील विविध मार्गावर वर्तुळाकार बदलांचे प्रयोग राबवीत आहेत. या बदलांमुळे नागरिकांना कोंडीतून तात्पुरता दिलासा मिळत आहे. मात्र, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हे वरवरचे उपाय अधिक गुंतागुंतीचे ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मध्यंतरी, वाहतूक पोलिसांनी शहरातील काही मार्गाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला असून त्याआधारे त्या मार्गावर वाहतुकीचे नियोजन आखण्यात येत आहे. असे असले तरी शहरांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी असणारी महापालिका मात्र अशा स्वरूपाचे पाऊल उचलताना दिसून येत नाही. मध्यंतरी, महापालिकेने ठाणे शहराला भेदून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी या मुख्य चौकांमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एका खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण केले होते. या संस्थेने महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याआधारे वाहतुकीचा अभ्यास अहवाल दिला होता. त्यानुसार, तीन हात नाका चौकामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याविषयी सर्वच स्तरांतून टीका होऊ लागल्याने महापालिकेने हा प्रस्ताव गुंडाळला.