माजिवडा पुलावर कंटेनर उलटल्याने घोडबंदर रस्त्यासह संपूर्ण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी

प्रत्येकी सात टन वजनाच्या विद्युत तारांची तीन बंडले घेऊन निघालेला कंटेनर सोमवारी सकाळी ठाण्यातील माजिवडा चौकातील उड्डाणपुलावर उलटला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु या दुर्घटनेनंतर घोडबंदर रस्त्यावरील आणि पर्यायाने शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीची पुरती दैना उडाली. या दुर्घटनेनंतर ठाण्यातील अवजड वाहनांची वाहतूक आणि त्यामुळे शहरातील एकूणच वाहतुकीला बसणारा फटका हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

घोडबंदरहून भिवंडीच्या दिशेने निघालेला हा कंटेनर माजिवडा उड्डाणपुलावरील वळणावर उलटला व त्यावरील तब्बल १४ टन वजनाची तारांची बंडले पुलावरून खाली कोसळली. माजिवडा चौकाजवळील पुलावरच हा अपघात घडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली. सुदैवाने तारांची बंडले खाली कोसळली तेव्हा पुलाखालील मार्गावरून वाहनांची वर्दळ नव्हती. अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.  चार तासांच्या अवधीनंतर पुलावर उलटलेला कंटेनर बाजूला काढण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आणि त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

अवजड वाहतूक पुलावरूनच

घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील उड्डाणपुलावर असलेल्या संरक्षक कठडय़ांना धडकून अवजड वाहनांचे अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडू लागले असून या अपघातांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करता येऊ शकते का याची चाचपणी सुरू केली होती. मात्र, त्यामध्ये पुलाखाली असलेल्या मार्गावर अनेक ठिकाणी जोडरस्ते असल्यामुळे येथील अवजड वाहनांचा प्रवास अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता समोर आली आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरून अवजड वाहनांचा सुरू असलेला प्रवास यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. घोडबंदर भागातील वाहतुकीसाठी हा एकमेव मार्ग आहे. गेल्या काही वर्षांत घोडबंदर भागाचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामार्गावर कापुरबावडी-माजिवडा, मानपाडा, पातलीपाडा आणि वाघबीळ या भागात उड्डाण पुलांची उभारणी करण्यात आली. या उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली असली, तरी या भागातील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटू शकलेली नाही. या उड्डाण पुलावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली असली तरी पुलाच्या संरक्षक कठडय़ांना धडकून अवजड वाहनांचे अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. कापुरबावडी ते माजिवडा या उड्डाण पुलावर वळण रस्ते असल्यामुळे या ठिकाणी या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. सोमवारी सकाळी याच पुलावरील एका वळणावर कंटेनर उलटून अपघात झाला. या अपघातामुळे उड्डाणपुलावरून सुरू असलेला अवजड वाहनांचा प्रवास धोकादायक असल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे. उड्डाण पुलावरून चालक अवजड वाहने भरधाव घेऊन जातात. मात्र, पुलावर वळण रस्ते असल्यामुळे त्या ठिकाणी चालकांना वाहनांचा वेग कमी करणे शक्य होत नाही आणि त्यामुळे वाहनाचा ताबा सुटून अपघात घडत असल्याची बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी उड्डाणपुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करता येऊ शकते का, याची चाचपणी वाहतूक पोलिसांनी सुरू केली होती. परंतु त्यामध्ये पुलाखाली असलेल्या मार्गावर अनेक ठिकाणी जोडरस्ते असल्यामुळे ही वाहतूक बंद करणे शक्य नसल्याचे समोर आले आहे.

अपघात रोखण्यासाठी उड्डाण पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा विचार आम्ही केला होता. मात्र पुलाखालील मार्गावर अनेक ठिकाणी जोडरस्ते असल्याने येथे अपघात होऊ शकतो. त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करणे शक्य नाही. उड्डाण पुलावर असलेल्या वळण रस्त्यांमुळे अपघात होत असल्याने त्या ठिकाणी वेगमर्यादेचे फलक आणि काळ्या-पिवळ्या रेडिअम पट्टय़ा बसविण्याची मागणी रस्ते विकास महामंडळाकडे केली आहे. संदीप पालवे, पोलीस उपायुक्त (वाहतूक)

कोंडीत आणखी भर

ठाणे : माजिवडा चौकातील उड्डाणपुलावर कंटेनर उलटल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचा बोऱ्या वाजला असतानाच याच परिसरात सोमवारी आणखी चार वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. कंटेनर उलटल्यानंतर वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील घोडबंदर-मुंबई मार्गिकेवरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळे उड्डाणपुलाखाली असलेल्या मार्गावर घोडबंदर तसेच बाळकुम-भिवंडी मार्गे येणाऱ्या वाहनांचा भार वाढला. असे असतानाच पोखरण रस्ता क्रमांक दोनवरून कापुरबावडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाळूचा ट्रक बंद पडला. त्यापाठोपाठ तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ मीरा-भाईंदर महापालिका परिवहन सेवेची बस, माजिवडय़ाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाण्याचा टँकर तर याच भागात टीएमटीची बस अशी तीन वाहने अर्धा तासाच्या फरकाने बंद पडली.