21 September 2020

News Flash

महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प

घोडबंदर पूल, ससूनवघर परिसरात पाणी साचले

घोडबंदर पूल, ससूनवघर परिसरात पाणी साचले

वसई : सोमवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वसई पूर्वेकडील भागात असलेला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला.

घोडबंदर पुलाजवळील ससूनवघर परिसर, मालजीपाडा येथील लोढा धाम अशा विविध ठिकाणच्या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक कोलमडून गेली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हा मुंबई, गुजरातसह इतर विभागांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. दररोज येथून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. दरवर्षी हा महामार्ग पावसाळ्यात पाण्याखाली जात आहे. यावर कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नाही.

मंगळवारी या भागातील ससूनवघर, मालजीपाडा अशा विविध ठिकाणच्या भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले असल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा अडथळा निर्माण झाला आहे. सकाळपासून येथील वाहतूक सेवा ठप्प झाल्याचे चित्र महामार्गावर दिसून आले आहे, तर दुसरीकडे काही अवजड वाहने भरलेल्या पाण्यातून वाट काढण्याच्या प्रयत्नात थेट दुभाजकावर गेल्याचे चित्र आहे. पाणी जाण्याचे मार्ग अगदी अरुंद असल्याने या भागातील पाण्याचा निचरा होणार कसा, असा सवाल या भागांतील नागरिकांनी केला आहे.

महामार्गालगतच मोठय़ा प्रमाणात अनधिकृत मातीभराव, अतिक्रमणे झाले असल्याने पाणी जाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत, तर अनेक ठिकाणच्या नाल्यात कचरा टाकून दिला जात असल्याने नाले तुंबले आहेत. पंरतु दरवर्षी जर अशीच पूरस्थिती निर्माण होत असते तरी योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

वाहतूक सेवा कोलमडली

राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने महामहामार्गावरील वाहतूक सेवा कोलमडली आहे. घोडबंदर पुलाजवळ ससूनवघर, ससूपाडा येथे मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे. त्यामुळे मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने व इतर ठिकाणी जाणारी वाहने अडकून पडली आहेत. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची व वाहनचालकांची चांगलीच गैरसोय झाली.

अडचणी दूर करण्यासाठी आयआरबीचे प्रयत्न

महामार्ग पाण्याखाली गेल्याने विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आयआरबीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. ५० ते ६० कामगार आणि अभियंत्यांच्या साहाय्याने पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे आयआरबीचे महामार्ग व्यवस्थापक निसार खान यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:17 am

Web Title: traffic jam due to mumbai ahmedabad national highway underwater zws 70
Next Stories
1 Coronavirus : रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर
2 उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोविड केंद्राला गळती
3 करोनाचा फटका सदनिका विक्रीला
Just Now!
X