News Flash

गणपती मिरवणुकांमुळे डोंबिवलीत रस्तोरस्ती कोंडीचे विघ्न

रिक्षा थांब्यावरील रांगेचे शेपूट फलाट क्रमांक तीनवरील रेल्वेपुलापर्यंत पोहोचले होते.

बेकायदा फेरीवाले आणि वाहनांच्या मनमानी अनधिकृत पार्किंगमुळे आधीच अरुंद झालेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकालगतच्या रस्त्यावर गणेश आगमनाच्या मिरवणुका निघाल्याने संपूर्ण शहर कोंडीमय झाले. रिक्षा थांब्यावरील रांगेचे शेपूट फलाट क्रमांक तीनवरील रेल्वेपुलापर्यंत पोहोचले होते.

ऐन गर्दीच्या वेळी सर्वाचे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे स्थानक परिसरातून मिरवणुका काढत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या उत्सवी मिरवणुकांमुळे गेल्या दोन दिवसांपासून डोंबिवलीकरांना अभूतपूर्व कोंडीचा सामना करावा लागत असला तरी वाहतूक पोलीस त्याकडे पूर्ण कानाडोळा करीत असल्याचाही आरोप आहे.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील एका गणेश उत्सव मंडळाची मिरवणूक निघाल्याने जागोजागी वाहतूक कोंडी झाली. ही मिरवणूक इंदिरा चौकातून महात्मा फुले रोडच्या दिशेने अत्यंत मंदगतीने जात असल्याने दोन्ही बाजूला वाहने खोळंबली. शहरातील इतर लहान-मोठय़ा गणेश मूर्त्यांचेही आगमन आणि मिरवणुका सध्या सुरू असल्याने पश्चिमेकडील द्वारका हॉटेल मार्ग, दीनदयाळ

रोड, डोंबिवली स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक वाहतूक कोंडीने त्रस्त होत आहेत. या कोंडीमुळे रिक्षाचालकही थांब्यांवर येणे टाळत असल्याने डोंबिवलीकरांचे हाल सुरू आहेत. ठिकठिकाणी जाण्यासाठी स्थानक परिसरात लांबच लांब रांगा लागत आहेत. जेमतेम दोन ते तीन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी डोंबिवलीतील वाहनचालकांना अध्र्या तासाहून अधिक वेळ लागत आहेत. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी मुख्य रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी त्यात चार रस्त्यावरील वाहतूक कोंडी यामुळे डोंबिवलीकर कमालीचे संतापले असून उत्सवांच्या काळात एवढय़ा महत्त्वाच्या चौकातील वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने होत नसल्याने नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

दणदणाटही कायम.. उत्सवांच्या काळात ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठीचे सर्व नियम पायदळी तुडवत डोंबिवली शहरात दणदणाटी डीजे मिरवणुका काढल्या जात आहेत. पोलीस याबाबत केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. वाहतूक कोंडी होणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलीस तैनात केले जातात, मात्र गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण करण्याची जबाबदारी केवळ एखाद-दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर असल्याचे दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 1:14 am

Web Title: traffic jam in dombivli
Next Stories
1 टाळ-झांजेमुळे तांबा-पितळेच्या बाजाराला चकाकी
2 सजावटीतील मखर, मंदिर खरेदीकडे भक्तांची पाठ
3 ‘मुंबईचा राजा’चा मान यंदा कोणाचा?
Just Now!
X